

डोंबिवली (ठाणे) : लोकार्पण झालेल्या कल्याण-शिळ महामार्गावरील पलावा जंक्शन जवळच्या उड्डाण पुलावर खून झालेल्या अज्ञात व्यक्तीची आकृती आढळून आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा (?) करून सदर आकृती तशीच ठेवून दिल्याने या आकृतीबद्दल एकीकडे नेटकऱ्यांना खुमासदार चर्चा करायला संधी मिळाली आहे. तर दुसरीकडे या भागाचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी उपरोधिक टीकेने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून पुलाचे बांधकाम करणाऱ्यांचा जणू बळीच घेतला आहे.
कल्याण-शिळ महामार्गावर वाहतूक कोडी, जीवघेणे प्रदूषण, इंधन अपव्ययासह प्रवासी, वाहन चालक आणि या महामार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांची जाचातून कायमस्वरूपी सुटका होण्यासाठी मनसेचे नेते तथा या भागाचे तत्कालिन आमदार आमदार राजू यांनी कासवगतीने चाललेल्या पलावा जंक्शन जवळ उड्डाण पूल उभारणीच्या कामाला वेग देण्यासाठी एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची पळता भुई थोडी करून टाकली होती. अखेर पुल बांधणीच्या कामाला वेग आला. तथापी पुलाचे बांधकाम करणाऱ्यांनी अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याची चौफेर टीका सुरू झाली. पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य आढळून येऊ लागले आहे.
माध्यमांत सुरू आहे. या पुलाचे नियंत्रक असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर बांधकामाच्या विचक्याचे खापर फोडले जात असतानाच त्याच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा गंभीर आरोप करत ठेकेदाराची देयके रोखण्यासह मे. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था अर्थात व्हीजेटीआयच्या तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी या भागाचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी केली आहे. तर दुसरीकडे उबाठाने संबंधितांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तरीही ४ जुलै रोजी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. आता लोकार्पण झालेल्या पलावा पुलावर गुणवत्तेचा खुन…..! या पापाचे नाथ कोण ? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी एक्स पोस्टद्वारे पुलावरील खड्ड्यांचे फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून खळबळ उडवून दिली आहे.