

ठाणे : आपल्या प्रेयसीला त्रास देत असल्याच्या करणातून प्रियकराने त्रास देणाऱ्या व्यक्तीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना बुधवारी ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. खून केल्यानंतर फरार झालेल्या दोघांना ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने नायगाव येथून अटक केली आहे. तर या घटनेतील महिला आरोपीस देखील ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 जानेवारी रोजी महेश नाखवा या तरुणाचा अज्ञात इसमाने चाकूने भोसकून खून केला. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्ह्याचा समांतर तपास ठाणेनगर पोलीस व गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे कक्ष पथक करीत होते. मालमत्ता गुन्हे कक्ष पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही व इतर तांत्रिक तपास करून खून करणाऱ्या दोन मारेकऱ्यांची ओळख शोधून काढली. त्यानंतर या दोघांचा शोध घेतला असता ते गुजरात राज्यात पळून जाण्याचा तयारी असल्याची माहिती पथकास मिळाली.
पथकाने दोघांचा माग काढत त्यांना नायगाव पूर्व येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अटक केली. काली उर्फ रघु जयंतीभाई चौहान (27, रा. गोकुळनगर, ता. जिल्हा राजकोट, गुजरात) आणि शायर विनुभाई मंगरोलिया (21, रा. सोवारीया, ता. बेसान, जिल्हा जुनागढ, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर या घटनेत सहभागी असलेल्या तरुणीस देखील ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
त्रास देण्याच्या कारणातून खून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी काली ऊर्फ रघु जयंतीभाई चौहान याच्या प्रेयसीस मयत नाखवा हा त्रास देत होता. या कारणातून काली व त्याचा साथीदार मंगरोलिया या दोघांनी मिळून महेशचा चाकूने भोसकून खून केला व घटनास्थळावरून पोबारा केला होता. दोघेही खून केल्यानंतर गुजरात राज्यात पळून जाणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून बेड्या ठोकल्या. तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या प्रेयसीला ठाणेनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.