

ठाणे : दिलीप शिंदे
सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी शिवसेना-भाजपने एकमेकांविरोधात आघाडी उघडल्याचे तीव्र पडसाद ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत दिसू लागले आहेत. बंडखोरांच्या आडून महायुतीमध्ये एकमेकांचे 17 उमेदवार पाडण्याची गुप्त खेळी तर खेळली जात नाही ना? अशी चर्चा ठाण्यात रंगली आहे. त्याचबरोबर शिवसेनाअंतर्गत कलह ही रस्त्यावर आल्याने वातावरण तापू लागले आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना बंडखोर आणि भाजप विरुद्ध शिवसेना बंडखोर असा संघर्ष टोकाला पोहचला आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुती झाल्याने अनेक इच्छुक नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. अशी प्रमुख बंडखोरी 16 प्रभागात झाली असून त्या बंडखोरीस दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून अभय मिळाल्याचे दिसून येते. या बंडखोरीमुळे काही प्रभागात तिहेरी, चौरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले असतानाही बंडखोरीकडे शिवसेना आणि भाजपच्या नेतृत्वाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार अस्वस्थ झालेले दिसून येतात. त्याचवेळी महायुतीच्या उमेदवारांना मदत व्हावी, विरोधी पक्षातील उमेदवाराकडे नाराज मतदार जाऊ नये, याकरिता अपक्षांची रणनीती आखली असावी, असा युक्तिवाद भोळ्याभाबड्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे.
सर्वात जास्त बंडखोरी ही शिवसेनेत झाली असून त्यांनी भाजपच्या पाच प्रमुख उमेदवारांना लक्ष केल्याचे दिसते. भाजपच्या किरण मणेरा, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, स्नेहा आंब्रे आणि सुनेश जोशी हे प्रमुख उमेदवार सेना बंडखोरांच्या निशाणावर आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर, नम्रता घरत, पद्मा भगत, लहू पाटील, विक्रांत वायचळ, सिद्धार्थ पांडे, परीषा सरनाईक, अनिता गौरी, मनाली पाटील, मनोज शिंदे आणि पवन कदम आदी प्रमुख उमेदवारांविरोधात शिवसेनेचेच माजी नगरसेवक, विभाग प्रमुखांनी उठाव केल्याचे दिसून येते. हे सर्व बंडखोर शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक असल्याने शिवसेनेचे अंतर्गत वाद कसे चव्हाट्यावर आले आहेत याचे चित्र स्पष्ट होते.
सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रभागात काहीच कामे केली नाहीत, असे आरोप सेनेच्याच बंडखोरांकडून होत असल्याने मतदार राजा या मनोरंजनाचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या तिकिटावर माझी पत्नी विजयी झाली तर पालिकेच्या पहिल्या सभेत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला भाग पाडेल अशी जाहीर घोषणाच सेनेच्या बंडखोर उमेदवाराने केल्याने प्रभाग एक मधील संघर्ष शिगेला गेला आहे. महायुतीमध्ये जुंपली असून या राजकीय परिस्थितीचा फायदा विरोधक कसे उचलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उठाव केला. तसेच काही प्रभागात मित्र पक्ष असलेल्या भाजप उमेदवारासमोर आव्हान उभे केले आहे. तसाच काहीसा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.