

ठाणे : ठाणे महापालिका निवडणूक ही शिवसेना - भाजप ही महायुतीमध्ये लढण्यावर आज झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. भाजपला जागा वाढवून देण्यास शिवसेनेने तयारी दर्शविली असली तरी शिवसेनेच्या तीन प्रभागांवर भाजपने दावा ठोकल्याने जागा वाटपाचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. या तीन जागांच्या तिढ्यावर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कोर्टात तोडगा निघून युतीची घोषणा होईल, असा विश्वास शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. युतीची ही घोषणा रविवारी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबईत महायुतीची घोषणा झाली असताना ठाण्यातील महायुतीबाबत शिवसेना नेत्यांनी दोन बैठकांनंतर चर्चा करण्यास टाळाटाळ केल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली होती. त्यामुळे भाजपने १३१ उमेदवारांना सज्ज राहण्यास सांगून शिवसेनेला अल्टिमेटम दिला होता. आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त करीत स्वबळाची तयारी असल्याचे सेनेला बजावले होते. अखेर आज भाजप कार्यालयात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. याबैठकीला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, सेना सचिव राम रेपाळे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि भाजपकडून निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, शहर अध्यक्ष संदीप लेले, माजी अध्यक्ष संजय वाघुले हे उपस्थित होते. मात्र आमदार संजय केळकर हे बैठकीला गैरहजर होते.
या बैठकीत महायुतीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. मात्र त्याची घोषणा ही तीन जागांचा तिढा सुटल्यानंतर करण्याचा निर्णय झाला. प्रभाग क्रमांक १, प्रभाग क्रमांक ५ आणि प्रभाग क्रमांक ७ यातील तीन जागांवर भाजपने दावा ठोकला आहे. या प्रभागांतील १२ ही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. मात्र माजी नगरसेवक नरेश मणेरा हे ठाकरे गटात कायम राहिले तर रागिणी बैरीशेट्टी ह्यांनी भाजपची वाट धरली. त्यामुळे प्रभाग एक मधील जागा भाजपाला सोडवी असा आग्रह धरला आहे. ही मागणी सेनेने फेटाळली आहे. कारण ती एकमेव जागा खुल्या गटातील आहे. ती जागा सोडली तर विद्यमान नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांना घरी बसावे लागेल.
प्रभाग पाच मध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपला जागा सोडण्यास विरोध केला आहे. जरी बैरीशेट्टी शिवसेनेनेतून जिंकल्या होत्या. त्यामुळे ही जागा सोडण्यास सेनेने नकार दिला आहे. प्रभागात सात मध्येही भाजपने एका जागेवर दावा ठोकला आहे. या मागण्यांचा निर्णय पक्ष श्रेष्ठीच्या रात्री उशिरा होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र भाजपाने ४० पेक्षा अधिक जागा मागणी लावून धरल्याने ४० पेक्षा दोन ते तीन अधिक जागा देण्यावर शिवसेनेने सहमती दर्शविल्याचे बोलले जात आहे.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खासदार नरेश म्हस्के यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ठाण्याची निवडणूक महायुतीमध्ये लढविली जाईल असे स्पष्ट केले. तीन जागांचा तिढा असून त्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे चर्चा झाल्यावर तोडगा निघेल असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार केळकर यांनी शिवसेनेला अल्टिमेटम दिले नसून त्यांनी लवकर युतीच्या घोषणा करण्याची इच्छा व्यक्त केली. आज ते दुसऱ्या कामात अडकल्यामुळे वाटाघाटीच्या बैठकीला उपस्थित नव्हते . माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पक्ष सोडला नव्हता असे सांगत म्हस्के म्हणाले महायुतीच्या बैठक होण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांनी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांना बैठकीला बोलावले नाही, याची कल्पना आनंद परांजपे यांना नसावी असा टोला लगावला. भाजपने लावलेल्या नमो भारत, नमो ठाण्याच्या बॅनरवर आमचा आक्षेप नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे ही नेते असल्याचे म्हस्के म्हणाले. ठाकरे शिवसेनेला मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये उमेदवार शोधण्यासाठी वणवण फिरत असून संजय राऊत यांनी आपला पक्ष सांभाळावा, असा सल्ला म्हस्के यांनी दिला.
उपमुख्यमंत्र्याशी चर्चा करणार - मीनाक्षी शिंदे
ज्या शाखाप्रमुखाने शाखा वाचविण्यासाठी तीन दिवस शाखेत झोपून काढले, त्याला चुकीच्या माहितीच्या आधारावर निलंबित करणे योग्य नाही. त्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला असून तो राजीनामा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. मी नाराज नसून कार्यकर्त्यावर चुकीच्या माहितीच्या आधारावर झालेल्या कारवाईवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी आज रात्री वेळ दिली असल्याचे माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रभागात भूषण भोईर यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.