Thane Municipal Election 2026 : ठाण्यात महाविकास आघाडी फुटली, काँग्रेस स्वबळावर लढणार
Thane Municipal Election 2026
ठाणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळी शिगेला पोहचली असतानाच राजकीय समीकरणेही वेगाने बदलत आहेत. आता ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेला पेच न सुटल्याने अखेर ठाण्यात महाविकास आघाडीत फूट पडली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस ठाण्यात स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आम्हाला फसवले
काळजात कट्यार घुसली असे म्हणत काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आम्हाला फसवले असून सन्मानजनक जागा न मिळाल्याने काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा आणि मुंब्र्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सर्व उमेदवार उतरविणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठक महिनाभर झाल्या. काल मला दोन तास बसवून निर्णय घेतला नाही. आमचे नगरसेवक राष्ट्रवादीने घेऊन आम्हाला जागा सोडल्या नाहीत. त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष गणेश पाटील आणि निरीक्षक श्रीरंग बर्गे हे उपस्थित होते.
जागावाटपाचा तिढा राहिला कायम
महानगरपालिका निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती. काँग्रेसने ठाणे जिल्ह्यात सन्मानजनक जागांची मागणी केली होती. मात्र, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने काँग्रेसला जास्त जागा देण्यास नकार दिला. वारंवार चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती विक्रांत चव्हाण यांनी दिली.
कळवा, मुंब्रा येथे स्वबळावर लढणार, ठाण्यातील काही जागांवर अर्ज भरणार
विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, कळबा आणि मुंब्रा येथे काँग्रेस आपले पूर्ण ताकदीनिशी उमेदवार उतरवणार असून येथे स्वबळावर लढणार आहे. तसेच ठाण्यातील अन्य महत्त्वाच्या जागांवरही काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना न राहता, अनेक ठिकाणी तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहेत.

