

Thane Municipal Corporation
ठाणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर गुरुवारी शेवटच्या दिवशी तब्बल २७० पेक्षा अधिक हरकती ठाणे महापालिकेकडे प्राप्त झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारींचा समावेश हा मुंब्रा आणि दिव्यामध्ये आहे . तर शहरातील कोपरी आणि माजिवड्यातूनही काही प्रमाणात हरकती प्राप्त झाल्या असून प्रामुख्याने काही प्रमाणात प्रभागांच्या हद्दी बदलण्यात आल्या असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाणे महापालिकेची निवडणुक येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात असून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने प्रारुप प्रभाग रचना तयार करून प्रसिद्ध केली आहे. यानुसार, २०१७ प्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्यात आली असून जनगणना झालेली नसल्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ झालेली नाही. यंदाही १३१ नगरसेवक आणि ३३ प्रभाग अशी रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रभाग रचनेत वाढ होण्याचे अंदाज बांधून नगरसेवक निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाला आहे.
ठाणे महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयारी केली असून त्यावर हरकती सूचना करण्यासाठी ४ सप्टेंबर ही अंतिम तारिख जाहीर करण्यात आली होती. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना असल्याने फारशा हरकती किंवा तक्रारी येणार नाहीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. सुरुवातीला हरकती घेण्याचे प्रमाण फारच काम होते. मुदत संपण्याच्या एक दिवस आधी तर केवळ ६१ हरकती निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर ४ सप्टेंबर शेवटच्या दिवशी तब्बल २७० हरकती पालिकेकडे प्राप्त झाल्या असून यामध्ये प्रामुख्याने मुंब्रा आणि दिवा परिसरात सर्वाधिक हरकती घेण्यात आल्या आहेत. तर माजिवडा आणि कोपरी परिसरातही काही प्रमाणात हरकती घेण्यात आल्या आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत काही प्रमाणात हद्दी बदलण्यात आल्या असल्याच्या या तक्रारी असल्याचे समोर आले आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर सेव्ह दिवा फाउंडेशनने हरकत घेतली असून याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देखील पालिकेच्या निवडणूक विभागाला दिला आहे. प्रभाग क्रमांक २७, २८, २९ आणि ३० साठी ही हरकत घेण्यात आली आहे. तक्रारदार रोहिदास मुंडे यांच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक २७, आणि २८ मध्ये काही भागांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे भौगोलिक सलगता तुटली असून लोकसंख्या असमतोल निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रभाग ३० वर अतिरिक्त लोकसंख्येचा भार पडला असून याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा मुंडे यांनी दिला आहे.