

ठाणे : नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. या विषयावर भाजपकडून मांडण्यात आलेल्या निषेध प्रस्तावावर चर्चा सुरू होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र वादावादी झाली. अखेर सभा अर्धा तास तहकूब करण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या भूमिकेचा निषेध करणारा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला. यावेळी भाजप व शिंदे गटाच्या नगरसेवकांनी विरोधकांवर महिला विरोधी भूमिका घेतल्याचा आरोप केला. विरोधकांनीही जोरदार प्रत्युत्तर देत, महिलांना आरक्षण देण्याचा विरोध नाही; मात्र जनगणनेपूर्वी लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करणे चुकीचे आहे, असा मुद्दा मांडला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “राष्ट्रपतींना योग्य सन्मान दिला जात नाही, हेच महिला विरोधी धोरण नाही का? असा सवाल उपस्थित केला. चर्चेदरम्यान वातावरण अधिकच तापले, जेव्हा भाजप नगरसेवक सुरेश कांबळे यांनी शरद पवार यांच्यावर वैयक्तिक टीका केली.
या वक्तव्याला राष्ट्रवादी व शिंदे गटाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला. सभागृह नेते हणमंत जगदाळे आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी संबंधित वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली. त्यानंतर कांबळे यांनी आपले शब्द मागे घेतले.
स्थानिक प्रश्नांवर भर द्या !
एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी या चर्चेमुळे सभागृहाचा वेळ वाया जात असल्याचे म्हटल्याने सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले. “महिलांवरील चर्चेला वेळ वाया जाणे कसे म्हणता?” असा सवाल करत त्यांनी पठाण यांना घेरले. यामुळे सभागृहातील वातावरण आणखी तापले. शेवटी, स्थानिक प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी मागणी करत पठाण यांनी हा विषय थांबवण्याचे आवाहन केले. सततच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले.