

ठाणे : मुंबईमधील साकीनाका येथे मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता ठाणे महापालिका देखील धास्तावली असून शहरातील सर्व मॅनहोलच्या तपासणीचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाण्यात ड्रेनेज आणि गटारे असे मिळून २ लाख मॅनहोल असून या सर्व मॅनहोलच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबईमधील कुर्ला साकीनाका या परिसरात गुरुवारी दुपारी खैरानी मार्गालगत मनुष्य प्रवेशिकेवर 'संरक्षक जाळी' बसविण्याची कार्यवाही सुरू असताना एका व्यक्तीचा संबंधित मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. भर पावसात सुरू असलेल्या या कामामुळे या घटनेची महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी गंभीर दखल घेत महापालिकेतील चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले आहे.
या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. मुंबईच्या या घटनेनंतर ठाणे महापालिकाही धास्तावली मुंबईसारखी घटना ठाण्यात घडू नये यासाठी संपूर्ण ठाणे शहरातील मॅनहोलच्या तपासणीची मोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २ लाखांपेक्षा अधिक मॅनहोलची संख्या आहे. एरव्ही या मॅनहोलकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठाणे महापालिकेने मुंबईच्या घटनेनंतर गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या मॅनहोलवर जाळ्या नाहीत किंवा ज्या मॅनहोलला दुरुस्तीची आवश्यकता आहे अशा मॅनहोलचा अहवाल तयार करून तत्काळ दुरुस्तीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मॅनहोलची संख्या २ लाखांच्या वर
दरम्यान ठाणे शहरातील मॅनहोलच्या तपासणीला देखील सुरुवात करण्यात आली आहे. तपासणी करण्यात येणाऱ्या मॅनहोलची संख्या ही २ लाखांच्या वर असल्याने प्रभाग समिती स्तरावर त्या-त्या प्रभाग समितीच्या अभियंत्यांच्या माध्यमातून याची तपासणी करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या घटनेनंतर पालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरले असून ठाणे महापालिका आता अलर्ट मोडवर आली आहे.