

मुंबई: मुंबईत वाहतूक व्यवस्थेचे जाळे उभारले जात असले तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही. त्यामुळे भूमिगत वाहतुकीचा पर्याय पुढे आला आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या सल्लागाराचा अहवाल लवकरच येणे अपेक्षित असून त्यानुसार प्रत्यक्षात वाहतूक बोगद्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
मुंबईकरांना वाहतुकीतून दिलासा मिळाला असला तरी रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटलेली नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मल्टी मॉडेल टनेल कनेक्टिव्हिटी ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत भूमिगत मेट्रो रेल्वे व कोस्टल रोड बोगद्याप्रमाणे बहुस्तरीय बोगद्यांचे जाळे विकसित केले जाणार आहे.
या प्रकल्पात एका स्तरावर वाहतूक तर दुसऱ्या स्तरावर केबल, गॅस लाईन व अन्य उपयुक्त सेवा तसेच मलनि:सरण पर्जन्य जलवाहिन्या प्रणाली टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे मुसळधार पावसातही वाहतूक सुरू ठेवण्यासह पूरप्रतिबंधक उपाय म्हणूनदेखील उपयोग होणार आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी डिसेंबर 2025 मध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती.
हा सल्लागार डिसेंबरपूर्वी प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासह आराखडा व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करणार आहे. हा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून सांगण्यात आले.
कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन 2016 च्या अहवालात मुंबईच्या रस्त्यांवर धावणाऱ्या खासगी वाहनांची संख्या प्रतिकिमी 700 होती. गेल्या दहा वर्षांमध्ये यात मोठी वाढ झाली असून ही संख्या प्रतिकिलोमीटर 900 ते 950वर गेल्याचा अंदाज पालिकेच्या वाहतूक विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
प्रतिकिमी सुमारे 732 कोटी खर्च
भूमिगत वाहतूक मार्गाचा सुमारे प्रतिकिमी 732 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात मुंबई शहरामध्ये विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये भूमिगत मार्ग बांधण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. सुरुवातीला सहा किलोमीटर मार्ग बांधण्याचा पालिकेचा विचार असून यासाठी तब्बल 4,392 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पात करणार आर्थिक तरतूद
मुंबई महानगरपालिकेच्या 2027-28 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात भूमिगत वाहतूक प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा शुभारंभ 2027 अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.