

ठाणे : ठाणे महापालिकेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत असल्याने आजच्या घडीला निम्मी ठाणे महापालिका ही रिकामी झाली आहे. नव्या भरतीला लागलेला ब्रेक आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण १० हजार ८८३ पदे मंजूर असून यापैकी ५ हजार ६१८ पदे ही भरण्यात आली आहे. उर्वरित ५ हजार २३५ पदे भरण्यात आली नसल्याने सेवेत रुजू असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे.
ठाणे महापालिका मुख्यालय आणि इतर नऊ प्रभाग समिती कार्यालये तसेच महापालिकेच्या मालकीचे हॉस्पिटल आणि इतर कार्यालये अशी मिळून १० हजारांपेक्षा अधिक पदांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये वर्ग १ पासून ते वर्ग ४ पर्यंतच्या संवर्गात सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, चौर्थश्रेणी कर्मचारी या सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गांचा समावेश आहे. मध्यंतरी अनेक शिक्षक आणि
लिपिकांना पदोन्नती देण्यात आली होती. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेत नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. एकीकडे भरती झाली नसताना दुसरीकडे मात्र निवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याने मंजूर पदे आणि रिक्त पदे यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आहे.
जानेवारी ते जून २०२५ या सहा महिन्याचा कालावधीत तब्बल २५० कर्मचारी हे निवृत्त झाले आहेत. यामध्ये वर्ग २ पासून ते वर्ग ४ पर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. निवृत्त झालेल्यांमध्ये वर्ग २ चे २०, वर्ग ३ चे ८५, वर्ग ४ चे १४५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येत्या काही काळात आणखी मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग निवृत्त होणार असल्याने एवढ्या मोठ्या महापालिकेचा कारभार निम्म्या कर्मचाऱ्यांवर कसा हाकणार असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.