

नेवाळी : शिळफाटा परिसरातील अनधिकृत अतिक्रमण, फेरीवाल्यांचा सुळसुळाट आणि वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर दै.पुढारीने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर ठाणे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. येथील एका संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आले असून दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. मात्र ही मोहीम एका दिवसासाठी नको तर कायमची सुरु ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक जेसीबी, ट्रक आणि मोठ्या मनुष्यबळासह थेट रस्त्यावर उतरले आहे. पहिल्या टप्प्यात बायपास ते गोटेघर, शिळफाटा ते महापे रोड, शिळफाटा ते कल्याणफाटा तसेच कल्याणफाटा ते देसाई नाका या मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत बांधकामांबरोबरच फूटपाथवरील अतिक्रमणे आणि अनधिकृत व्यवसायांवरही कारवाई केली जात आहे. त्यामुळे आता अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे.
भूमिपुत्र धर्माभिमानी संघाने नुकताच ठाणे मनपाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देत या भागातील अनधिकृत पार्किंग, फेरीवाले, रस्त्यालगत उभारलेले अडथळे आणि नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले होते. या प्रश्नांमुळे वाहतूक कोंडी वाढत असून पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाणही वाढत असल्याचा मुद्दा संघाने मांडला होता. त्यानंतर अखेर ठाणे मनपाने कारवाई हाती घेतली आहे.सुरू झालेल्या कारवाईमुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांना फूटपाथवरून सुरक्षितपणे चालण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. मात्र ही मोहीम केवळ दिखाव्यासाठी किंवा काही दिवसांची न राहता नियमित आणि सातत्याने सुरू ठेवावी,अशी मागणी भूमिपुत्र धर्माभिमानी संघाने केली आहे.