

ठाणे : प्रवीण सोनावणे
राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महापौरपदाचे भवितव्य अखेर स्पष्ट झाले आहे. आगामी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले असून या पदावर अनुसूचित जातीच्या महिला किंवा पुरुष नगरसेवक बसू शकतात. गुरुवारी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर महापौर पदासाठी शिवसेनेतील प्रमुख आठ नावे चर्चेत आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालणार याबाबत ठाण्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 75 जागा जिंकून एकहाती वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेत शिवसेनेचे पूर्ण बहुमत असून महापौर शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट झाले होते. निवडणुकीच्या पूर्वी प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली होती. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 3, ओबीसी 35 तर सर्वसाधारण 84 अशा जागांचा समावेश होता.
प्रभाग निहाय आरक्षणाचा विचार केला असता अनुसूचित जातीसाठी 3(अ) महिला, 6(महिला), 6(अ) महिला, 7(अ) महिला, 9(अ) महिला 15(अ),16(अ), 22(अ), 24(अ), 28(अ)हे सर्व अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले होते. त्यानंतर महापौर पदाचे आरक्षण काय पडणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमध्ये हे पद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हालचाली तीव्र झाल्या असून इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
महापौर पदासाठी आरक्षण जाहीर होण्यापूर्वी अनेक नावांची चर्चा होती. मात्र आता महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्यानंतर या ठिकाणी अनुसूचित जाती मधील पुरुष किंवा महिला या पदावर बसणार आहे. या पदावर दर्शना जानकर तसेच पद्मा भगत यांच्या नावासोबतच आणखी काही नगरसेवकांच्या नावाची देखील चर्चा आहे. मात्र यांची नावे सध्या राजकीय वर्तुळात आघाडीवर असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौर पदासाठी या नावांची आहे चर्चा...
ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी चार नावांची चर्चा आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात येत असलेल्या 16(अ) मधून दर्शना जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्याचसोबत 3(अ) मधून पद्मा भगत यांच्या नावाची देखील चर्चा आहे. 6(अ) मधून वनिता घोगरे,7(अ) मधून विमल भोईर यांच्या नावाची देखील चर्चा असून यापैकी कोणाची निवड होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.
आरक्षणामुळे प्रस्थापितांना धक्का ...
महापौर आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वी या पदासाठी अनेक प्रस्थापित नगरसेवक आणि त्यांच्या नगरसेवक पत्नीची या पदावर वर्णी लागावी यासाठी फिल्डिंग लावली होती. सर्वसाधारण किंवा सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्यास अनेकजण या पदासाठी इच्छुक होते. मात्र महापौर पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने प्रस्थापितांना देखील मोठा धक्का बसला आहे.