

ठाणे : ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कर्करोग निदान मोहिमेतून धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये केलेल्या तपासण्यांमध्ये 53 महिला कर्करोग संशयित असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना ग्रामीण भागातील महिलांमध्ये वेळेवर तपासणी न होणे, लक्षणांकडे दुर्लक्ष आणि जागरूकतेचा अभाव याचे प्रतिबिंब या आकडेवारीतून स्पष्ट हेोत आहे.
भारतात स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोग हे महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे कर्करोग प्रकार असून, ग्रामीण भागात त्याचे उशिरा निदान होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यानुषंगाने कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये फिरणाऱ्या कर्करोग निदान व्हॅनद्वारे मुख, स्तन आणि गर्भाशयमुख कर्करोग तपासण्या करण्यात आल्या. 3 ते 29 नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली. कर्करोगाचे उशिरा निदान झाल्यास उपचार खर्चिक आणि गुंतागुंतीचे बनतात. तर लवकर निदान झाल्यास जीवितदर 60 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढतो हे लक्षात घेऊन ही तपासणी थेट नागरिकांच्या दारी नेण्यात आली.
या उपक्रमादरम्यान तपासलेल्या 5 हजार 143 नागरिकांपैकी 53 महिला संशयित आढळल्या आहेत. त्यापैकी स्तन कर्करोगाचे संशयित प्रमाण सर्वाधिक 34 असून, गर्भाशयमुख कर्करोगात 14 आणि मुख कर्करोगात 5 रुग्ण संशयित आढळले आहेत. संशयितांपैकी 8 जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले की, महिलांमध्ये दिसणारी गाठ, असामान्य रक्तस्राव, दीर्घकाळ टिकणारी जखम, तोंडातील पांढरे चट्टे, गिळताना त्रास, वेदना किंवा थकवा यांसारखी लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात. हीच लक्षणे कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे ठरू शकतात, त्यामुळे अशा तपासण्या अत्यावश्यक आहेत.
आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे महिलांमध्ये या तपासणीसाठी प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी प्रथमच कर्करोगाबाबत तपासणी करून घेतल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना कर्करोगाविषयी गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत; अशा परिस्थितीत मोबाईल व्हॅनमधील तत्काळ आणि सुरक्षित तपासणी ही मोठी दिलासा देणारी ठरली असे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.