

नेवाळी : डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर बीएसयूपी वसाहत व आयरे रोड परिसरात सीसीटीव्हीचे जाळे पसरवले जात असून यामुळे महिला सुरक्षिततेस आधार मिळणार असून परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीलाही आळा बसणार आहे.
दत्तनगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला बळकटी देण्यासाठी संपूर्ण वसाहतीमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाचा भव्य शुभारंभ रविवारी करण्यात आला. डोंबिवलीमध्ये दत्तनगर परिसरात लावण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे महिला सुरक्षेला मिळणार मोठा आधार मिळणार आहे.
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्राचे आ. राजेश मोरे यांच्या उपस्थितीत स्थानिक मान्यवर व नागरिकांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. डोंबिवलीत पसरवल्या जाणाऱ्या तिसऱ्या डोळ्याच्या जाळ्याने गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणांना मोठे सहकार्य होणार आहे.
डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागात चोरट्यांचे पराक्रम सुरूच असतात. परिसरात तिसऱ्या डोळ्याची नजर नसल्याने चोरट्यांचे पराक्रम यशस्वी होतात. यासाठी आता सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेला नवी गती मिळणार असून विशेषतः महिलांचे संरक्षण, रात्रीची सुरक्षितता आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणावर सीसीटीव्ही प्रणाली प्रभावीपणे लक्ष ठेवणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, पार्किंग क्षेत्र, रस्त्यांवरील हालचाली तसेच संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवता येणार असल्याने नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभेल. दत्तनगर व आयरे परिसरात वाढलेल्या चोरी, भांडणे, वाहन चोरीसारख्या घटनांवर आळा घालण्यास हे कॅमेरे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.