Manpada Junction Traffic | मानपाडा जंक्शन ठरले वाहतूक कोंडीचे केंद्र: कल्याण - शीळ रस्त्यावरील डिव्हायडरवरून जीवघेणा प्रवास, रुग्णवाहिका अडकल्या

मेट्रोच्या ढिसाळ नियोजनाचा फटका, वाहतूक नियोजनाचा बोजवारा
Kalyan Shil Road Traffic Congestion
Kalyan Shil Road Traffic CongestionPudhari
Published on
Updated on

Kalyan Shil Road Traffic Congestion

नेवाळी: मानपाडा जंक्शन ते घारीवली-काटई चौक दरम्यान बुधवारी (दि.१) सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने कल्याण-शीळ मार्गावरील वाहतुकीचे अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. आधीच मेट्रो-१२ च्या संथ आणि विस्कळीत कामामुळे त्रस्त असलेल्या वाहनचालकांना तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून मरणयातना सहन कराव्या लागल्या आहेत. कामावर जाणारे कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे.

मानपाडा जंक्शन हे बदलापूर, काटई, डोंबिवली, कल्याण आणि रुणवाल गार्डनकडून येणाऱ्या वाहनांचे प्रमुख केंद्र आहे. मात्र, मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. मानपाडा ते काटई नाका दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली, तर रुग्णवाहिकादेखील वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

Kalyan Shil Road Traffic Congestion
Thane Rain | ठाणे जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीने कबुतरांचे संकट दूर, बळीराजा सुखावला

वाहतूक पोलिसांची पुरेशी कुमक नसल्याने अनेक वाहनचालकांनी चुकीच्या मार्गाने वाहने घुसवली आहेत. काही दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी तर चक्क डिव्हायडरवरून जीव धोक्यात घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तुटलेले आणि उघडे डिव्हायडर अपघाताला निमंत्रण देत असून, एखादा वाहनचालक खाली पडल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पात नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आणि वाहतूक व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, रोजच्या या नरकयातनेवर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा मात्र मौन बाळगून आहेत. उद्घाटने, सत्कार आणि राजकीय कार्यक्रमांत व्यस्त असलेल्या लोकप्रतिनिधींनी आता रस्त्यावर उतरून नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी तीव्र भावना वाहनचालकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा, संतप्त नागरिकांचा उद्रेक अटळ असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news