Thane Rain | ठाणे जिल्ह्यात पावसाच्या दमदार हजेरीने कबुतरांचे संकट दूर, बळीराजा सुखावला

दमदार पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित
Thane District Heavy Rain
Thane District Heavy Rain Pudhari
Published on
Updated on

Thane District Heavy Rain

नेवाळी : ठाणे जिल्ह्यात बुधवारी (दि.१) पहाटेपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे पेरणी केलेल्या भात बियाण्यावर शहरांमधून आलेल्या कबुतरांच्या थव्यांनी ताव मारल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र बुधवारी झालेल्या दमदार पावसामुळे भात बियाणे उगवण्यास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.

अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड परिसर, कल्याण तालुक्यातील खोणी, उंबार्ली, निळजे, सोनारपाडा तसेच ठाणे तालुक्यातील विविध गावांमध्ये पेरणी झालेल्या शेतात हिरवागार कोंब डोकावू लागला आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून असलेली दुबार पेरणीची भीती काही प्रमाणात कमी झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी दिवसरात्र शेतात पहारा देत होते.

Thane District Heavy Rain
Thane road waterlogging : पहिल्याच पावसात एमआयडीसीचा भोंगळ कारभार उघडा

अनेकांनी कबुतरांना हुसकावण्यासाठी प्लास्टिक आणि कापडाचे झेंडे उभारले होते. कबुतरांच्या उपद्रवामुळे मोठ्या प्रमाणात बियाण्याचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात होती. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील बियाण्यांना आवश्यक ओलावा मिळाला आणि त्याची उगवण वेगाने सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांच्या मते, पुढील काही दिवसही समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास यंदाच्या भात हंगामाला चांगली सुरुवात होईल. सध्या शेतांमध्ये उगवलेले हिरवेगार भाताचे कोंब पाहून बळीराजा नव्या आशेने पुढील शेतीकामाला लागला असून यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news