Thane Building Collapse: किसननगरमध्ये इमारतीचा भाग कोसळला; ८० रहिवाशांचे स्थलांतर, चार दुचाकींचे नुकसान

जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर..
Thane Building Collapse
Thane Building CollapsePudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील संगम सदन इमारतीच्या गॅलरीचा भाग रविवारी दुपारी अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, इमारतीखाली पार्क केलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. गॅलरीचा उर्वरित भाग धोकादायक असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून, सुमारे ८० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

या घटनेमुळे दाटीवाटीच्या किसननगर परिसरातील जीर्ण आणि जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा तसेच त्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

किसननगर पोलीस चौकीसमोर असलेल्या संगम सदन इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची माहिती दुपारी अडीचच्या सुमारास ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

Thane Building Collapse
Raigad Fort Search Operation: रायगड किल्ल्यावर बेपत्ता तरुणाचा शोध संपला; ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने मृतदेहाचा ठाव

इमारतीची पाहणी करून संभाव्य धोका लक्षात घेता संपूर्ण इमारत रिकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही इमारत तळमजला अधिक तीन मजली असून सुमारे २८ वर्षे जुनी आहे. इमारतीमध्ये २७ सदनिका आणि चार गाळे आहेत.

सुमारे ८० रहिवासी येथे वास्तव्यास होते. या इमारतीचा समावेश ‘सी-२ बी’ प्रवर्गात करण्यात आला असून, रहिवाशांनी इमारतीत वास्तव्यास असतानाच आवश्यक दुरुस्ती करावी, अशा स्वरूपाचे तिचे वर्गीकरण असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

दुपारी अचानक गॅलरीचा सज्जा कोसळून खाली पार्क केलेल्या दुचाकींवर पडला. त्यामुळे दोन होंडा ॲक्टिव्हा, एक होंडा हॉर्नेट आणि एका ज्युपिटरचे नुकसान झाले. दुर्घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही मोठी जीवितहानी टळल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुनर्विकासाला गती देण्याची गरज

किसननगरसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न केवळ इमारतीच्या मालकीपुरता किंवा विकासकाच्या प्रस्तावापुरता मर्यादित राहिलेला नाही. रहिवाशांची सुरक्षितता, त्यांना मिळणारे पर्यायी निवासस्थान,पुनर्विकासाचा कालावधी आणि पुनर्विकास पूर्ण होईपर्यंतची व्यवस्था महत्त्वाच्या आहेत.

Thane Building Collapse
Pali Dirty Water Supply: अष्टविनायक क्षेत्रातच गढूळ पाण्याचा पुरवठा! अंबा नदीचे पाणी थेट घराघरांत; शुद्धीकरण योजनेची प्रतीक्षा

जीर्ण इमारतींचा पुनर्विकास रखडल्यास रहिवाशांना वर्षानुवर्षे धोकादायक परिस्थितीत राहावे लागते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने किसननगर परिसरातील जुन्या इमारतींचे सर्वेक्षण करून, धोकादायक इमारतींची स्वतंत्र यादी तयार करणे, त्यानुसार दुरुस्ती किंवा पुनर्विकासासाठी कालबद्ध कृती आराखडा आवश्यक आहे.

संगम सदनमधील दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली तरी ही घटना प्रशासन, रहिवाशांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. आज गॅलरीचा भाग कोसळला; मात्र भविष्यात जीर्ण इमारतींकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किसननगरमधील जीर्ण इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न हाताळून पुनर्विकास प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे.

किसननगरमध्ये जीर्ण इमारतींचे आव्हान

किसननगर परिसर हा अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. वाढती लोकसंख्या, जुन्या इमारती, अरुंद रस्ते आणि मर्यादित मोकळी जागा यामुळे अशा दुर्घटनांच्या वेळी बचावकार्य करतानाही प्रशासनासमोर आव्हाने निर्माण होतात. परिसरातील अनेक इमारती जुन्या झाल्याने त्यांची डागडुजी, संरचनात्मक सुरक्षितता आणि पुनर्विकासाचा प्रश्न सातत्याने चर्चेत आहे. संगम सदनमधील दुर्घटनेमुळे केवळ एका इमारतीच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलेला नसून, किसननगरमधील जुन्या इमारतींच्या भवितव्याचाही मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

एखाद्या इमारतीचा भाग कोसळल्यानंतरच प्रशासनाने हालचाल करण्याऐवजी धोकादायक आणि जीर्ण इमारतींचे नियमित संरचनात्मक परीक्षण करणे, आवश्यक दुरुस्तीबाबत रहिवाशांना मार्गदर्शन करणे आणि ज्या इमारतींची दुरुस्ती शक्य नाही अशा इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रभावी धोरण राबविणे गरजेचे आहे.

८० रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर

गॅलरीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी केली. येथील कुटुंबांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था हाजुरी येथील रेंटल इमारतीमध्ये करण्यात आली आहे. काही रहिवाशांनी नातेवाईकांकडे राहण्याची व्यवस्था केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news