

डोंबिवली शहर : ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात पाणीटंचाईने नागरिक हैराण असताना, काटई नाक्याजवळ पाणीचोरीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. कल्याण-बदलापूर महामार्गालगत मुख्य जलवाहिनीला भगदाड पाडून हजारो लिटर पाण्याची चोरी केली जात असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसांत परिसरात मोठ्या प्रमाणावर कार आणि बाईक वॉशिंग सेंटर्स सुरू झाले आहेत. मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत कनेक्शन घेऊन दिवसाढवळ्या पाणी उपसा केला जात आहे. मोटारींच्या सहाय्याने हे पाणी साठवण टाक्यांमध्ये भरून वाहन धुण्यासाठी वापरले जात आहे.
सदर जलवाहिनीमधून ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसराला पाणीपुरवठा केला जातो. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या पाणीचोरीमुळे या शहरांना पाणीटंचाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामार्गावर हे प्रकार उघडपणे सुरू असतानाही एमआयडीसी प्रशासन आणि संबंधित अभियंत्यांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पाणी विकत घेण्याची वेळ
सध्या एप्रिल महिन्यात ठाणे आणि मीरा भाईंदर भागात पाणीटंचाईमुळे अनेक ठिकाणी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत शेकडो लिटर पाणी महामार्गावर वाहने धुण्यासाठी अक्षरशः वाया घालवले जात आहे. “आम्हाला पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि इथे गाड्या धुण्यासाठी पालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत पाणी चोरले जाते, हे दुर्दैव आहे,” अशी प्रतिक्रिया एका त्रस्त रहिवाशाने दिली.