

खानिवडे : वसईत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून 811 हेक्टर जागेत कांदळवन क्षेत्र आढळून आले असून ते आता कांदळवन विभागाच्या अखत्यारीत घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या भागाची खातरजमा करून ते ताब्यात घेतले जाणार आहे. कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार झाला आहे.
वसई विरारमध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या मध्ये काही कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येतो. पर्यावरणीय दृष्टीने ही कांदळवने अत्यन्त महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तर कांदळवनांमध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत असतात. मात्र मागील काही वर्षांपासून वसई तालुक्यातील कांदळवन कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारणे, बेसुमार वाळू उपसा, मातीभराव अशा विविध प्रकारे कांदळवने नष्ट केली जात आहेत.
त्यामुळे खाडी किनार्याच्या भागातील कांदळवन क्षेत्र कमी होऊ लागले आहे. या कांदळवनांची कत्तल व संवर्धनासाठी स्वतंत्र असा कांदळवन विभाग आहे. त्यांच्या मार्फत विविध उपक्रम राबवून कांदळवन क्षेत्राचे संवर्धन केले जात आहे. जे कांदळवन क्षेत्र महसूल विभागाकडे येते ते कांदळवन विभागाकडे वर्ग केल्यास स्वतंत्र लक्ष ठेवून कत्तली विरोधात कारवाई व संवर्धनासाठी उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.
कांदळवन क्षेत्र वर्ग करण्यासाठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव दिला आहे. याशिवाय कोण कोणत्या भागात किती कांदळवन क्षेत्र आहे याचा आढावा घेतला जात आहे.नुकताच केलेल्या पाहणी दरम्यान जवळपास 811 हेक्टर क्षेत्रात कांदळवन असल्याचे आढळून आले आहे.
वसईच्या महसूल विभागाने अतिक्रमण करणार्या विरोधात कारवाई सुरू केली होती. त्यावेळी त्यांनी नायगाव, ससूनवघर, जूचंद्र, शिरगाव, नारिंगी अशा विविध ठिकाणच्या भागात अतिक्रमण करणार्यावर गुन्हे दाखल केले होते. वर्षभरात 13 गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही 10 तक्रारी उपविभागीय कार्यालयात दाखल केल्या आहेत त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
वसई -विरार शहरात शासकीय खाजन व पाणथळ जागेतील अतिक्रमण वाढीस लागत आहे. त्यावर असलेले कांदळवनांची वृक्ष त्यांची कत्तल करून त्यावर चाळी उभारणे असे प्रकार घडत आहेत. यावर वेळीच आवर घालण्यासाठी आता पासून योग्य ते प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण प्रेमींनी सांगितले आहे. कांदळवन नष्ट झाले तर विविध प्रजातीच्या पशुपक्षांचा अधिवास धोक्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे.
कांदळवन कक्षाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवून कांदळवने संवर्धन केले जात आहे. याशिवाय कांदळवन क्षेत्राचा आढावा घेऊन ते ताब्यात घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
सागर आरडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन विभाग