

डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानकातील स्कायवाॅक चोर, लुटारू आणि गर्दुल्ल्यांना आंदण दिल्याचे वारंवार होणाऱ्या सशस्त्र लूटमारीच्या घटनांतून स्पष्ट झाले आहे. रात्रीच्या सुमारास एका २१ वर्षीय तरूणाला दोघा बदमाशांनी लुटले. या बदमाशांनी प्रवासी तरूणाकडील बॅग आणि मोबाईल असा एकूण सात हजारांहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला आहे. गेल्या महिन्यात घडलेल्या या घटनेनंतर रविवारी तरूणाच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. मेहरान शाईस्ता मेमन (२१) असे तक्रारदार तरूणाचे नाव असून तो कौसा-मुंब्रा भागात राहणारा आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार मेहरान मेमन हा मोबाईलवर बोलत कल्याण स्थानकातील स्कायवाॅकवरून फलाटाच्या दिशेने जात होता. मोबाईलवर बोलत असताना इतक्यात पाठीमागून दोन अनोळखी तरूण आले. काही कळण्याच्या आत त्या बदमाशांनी मेहरानच्या डोक्यात जोरदार ठोसा लगावला. अचानक घडलेल्या या प्रकाराने मेहरान घाबरला. मारहाण करणारे बदमाश मेहरानकडे त्याच्या बॅगची मागणी करू लागले. मात्र मेहरान याने बॅग देण्यास इन्कार केला. मेहरानने प्रतिकार केल्यामुळे लुटारू खवळले. एकाने त्याच्या हातावरील कडा काढून मेहरानच्या डोक्यात हाणला. या हल्ल्यात मेहरानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्रीची वेळ असल्याने स्कायवाॅकवर प्रवाशांची वर्दळ कमी होती. त्यामुळे मेहरानच्या बचावासाठी कुणीही प्रवासी पुढे आला नाही.
दोघा बदमाशांनी मेहरानला पकडून त्याच्याकडील बॅग हिसकावून मोबाईलसह मनगटी घड्याळ खेचून पळ काढला. बदमाशांनी केलेल्या हल्ल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या मेहरानवर रूग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर त्याने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून फरार दोघा बदमाशांचा शोध सुरू केला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कल्याण रेल्वे स्थानक परिसरासह राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात रात्री दहा वाजल्यानंतर प्रवासी आणि पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रमाण वाढले आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रात्रीच्या सुमारास गस्त घालणारे पोलिस असुनही गर्दुल्ले, चोर, लुटारू, भुरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. गस्तीच्या ठिकाणाहून पोलिस गायब होताच असे प्रकार घडतात. चोर-लुटारूंच्या टोळ्यांमध्ये महिलांचाही सहभाग असल्याच्या प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत.