उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ बांधलेला स्कायवॉक हा धोकादायक असल्याचे महापालिका प्रशासनाच्या स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये नमूद केले आहे. या स्कायवॉकची त्वरित डागडूजी करणे आवश्यक असल्याचेही त्यात नमूद केले आहे. मात्र एमएमआरडीए आणि उल्हासनगर पालिका प्रशासन ही जबाबदारी आपली नसल्याचे सांगत याप्रकरणी दुर्लक्ष करीत आहेत. हा स्कायवॉक रेल्वे स्थानक परीसरात असल्याने कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे अशी मागणी एक हात मदतीचा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विजय कदम यांनी केली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ पूर्व व पश्चिम भागाला जोडणार्या स्कायवॉकचे बांधकाम तत्कालीन आमदार पप्पू कलानी यांच्या प्रयत्नाने 2008 मध्ये सुरू झाले होते. 2010 मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. या स्कायवॉकचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक आणि एमएमआरडीएच्या सदस्यांच्या उपस्थितीत झाले होते. 34 कोटी रुपये खर्चून बांधलेला हा स्कायवॉक उल्हासनगर स्थानक पूर्व आणि पश्चिमेकडील लोकांना ये-जा करण्यासाठी बनवण्यात आला आहे.
पंधरा वर्षांनंतर देखभालीअभावी स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. फरश्या तुटल्या आहेत, पिलर्स ढासळू लागले आहेत. छप्पराची तोडफोड झाली असून रेलिंग देखील अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. यामुळे पुलावरून जाणार्या पादचार्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला असता हा स्कायवॉक 2017 नंतर उल्हासनगर महानगरपालिकेच्या ताब्यात दिला असल्याचे या पूर्वीच माहिती अधिकारात समोर आले आहे. त्याची डागडूजी करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे असे एमएमआरडीएने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. तर उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम वि भागाकडे याप्रकरणी चौकशी केली असता त्यांनी स्काय वॉक बाबत 90 पानांचा स्ट्रक्चरल ऑडिट तयार केला आहे. त्यात या स्कायवॉकची तातडीने डागडुजी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती विजय कदम यांनी दिली.
या संदर्भात उल्हासनगर पालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तरुण सेवकानी यांना विचारले असता ते म्हणाले की आमच्या अहवालात या स्कायवॉकची डागडुजी करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र हा स्कायवॉक धोकादायक स्थितीत नाही, आम्ही एमएमआरडीला या संबंधात पत्र व्यवहार करून ज्या स्थितीत पूर्वी स्कायवॉक होता त्या स्थितीत करून द्यावा त्यानंतर आम्ही डागडूजी करू अशी आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे सध्या उल्हासनगर पालिकेकडे स्कायवॉकच्या डागडुजीसाठी निधी नाही. निधी प्राप्त झाल्यास आम्ही डागडुजीच्या कामाला सुरुवात करू.
स्कायवॉक गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे. येथून ये-जा करणार्या लोकांना लुटण्याचे, मारहाण करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. एवढेच नव्हे तर तीन वर्षांपूर्वी एका पोलिस कर्मचार्यावर अंधाराचा फायदा घेत गर्दुल्यांनी हल्ला केला होता त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. असे गंभीर गुन्हे या ठिकाणी घडत आहेत. या स्कायवॉक जवळच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर देखील कोणतेही प्रशासन या स्कायवॉकच्या सुरक्षेबाबत आजही गंभीर दिसत नाही.