

Kalyan Shilphata Road Traffic Jam
ठाणे : राज्यातील बहुतांश शाळा सोमवारी (दि.१५) सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा पहिला दिवस उत्साहात साजरा होण्याऐवजी कल्याण-शिळफाटा मार्गावरील भीषण वाहतूक कोंडीत अडकून गेला आहे. सकाळपासून काटई नाका, मानपाडा रोड, रूनवाल गार्डन, मानपाडा चौक आणि परिसरातील प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच रुग्णवाहिका तासन्तास कोंडीत अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.
कल्याण-शिळफाटा मार्गावरील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, रखडलेले सहा पदरी रुंदीकरण आणि संथ गतीने सुरू असलेली विकासकामे याला प्रमुख कारण मानले जात आहे. स्थानिक शेतकरी व भूमिपुत्रांना अद्याप योग्य मोबदला न मिळाल्याने रस्त्याचे रुंदीकरण पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही. परिणामी वाढत्या वाहनसंख्येचा भार अरुंद रस्त्यावर पडत असून वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडत आहे.
याशिवाय मेट्रो-१२ प्रकल्पाचे काम सुरू असल्याने काही ठिकाणी आधीच मर्यादित असलेली रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. त्यामुळे दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागली आहे. कोंडीत अडकलेल्या वाहनांमुळे इंधनाची नासाडी, वेळेचा अपव्यय आणि वाढते वायू प्रदूषण यांचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.
या संदर्भात स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र गजानन जयवंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार वर्गाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. सामान्य जनता रस्त्यावर उतरण्यापूर्वी लोकप्रतिनिधी आणि शासन यंत्रणा ठोस उपाययोजना करणार का?” असा सवाल उपस्थित केला आहे.