

डोंबिवली : दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच कल्याण-डोंबिवलीत आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असे. मात्र, यंदा 'अल निनो' आणि 'आयओडी'च्या प्रभावामुळे उन्हाळा अत्यंत रणरणता गेला असून, पावसाळ्याची सुरुवातही लांबणीवर पडली आहे. त्यातच बारवी धरणातील पाणीसाठा आता अवघा २७ टक्केच शिल्लक राहिला आहे. परिणामी, जलसंपदा विभागाच्या निर्देशांनुसार शहरात २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. आता आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने, आधीच पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांवर जलसंकट अधिक ओढवले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मोहने आणि मोहिली येथील स्वतःच्या जलशुद्धीकरण केंद्रांतून शहराला पाणीपुरवठा करते. तर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना 'एमआयडीसी'मार्फत (MIDC) पाणीपुरवठा केला जातो. मात्र, शहराची वाढती लोकसंख्या आणि पाणी वितरण व्यवस्थेतील तांत्रिक दोष यामुळे अनेक भागांत सध्यातरी पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. परिणामी नागरिक त्रस्त झाले असून, अनेक सोसायट्यांना खाजगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही, तोपर्यंत केडीएमसीकडून (KDMC) दरदिवशी २० टक्के पाणीकपात करून ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे आधीच टंचाईग्रस्त असलेल्या भागात जलसंकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.
१७ जून (डोंबिवली पूर्व) : नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पूर्वेतील 'एफ' आणि 'जी' वॉर्डचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहील.
१८ जून (कल्याण) : बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा 'डी' आणि 'जे' वॉर्डचा पाणीपुरवठा बंद राहील.
१९ जून (डोंबिवली पश्चिम) : नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा डोंबिवली पश्चिमेतील 'एच' वॉर्डचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.
बारावे केंद्र (कल्याण पश्चिम) : बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा कल्याण पश्चिमेतील 'बी' आणि 'सी' वॉर्डचा पाणीपुरवठाही बंद राहील.
मोहिली केंद्र (मांडा-टिटवाळा व परिसर) : मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा मांडा-टिटवाळा, शहाड 'ए' वॉर्ड, तसेच 'बी' वॉर्डमधील योगीधाम ते वालधुनी परिसराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.