

नेवाळी : कल्याण-शिळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी वाहन चालकांनी गावातील रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. कल्याण फाटा चौकात थेट प्रवेश मिळत असल्याने डायघर गावामधून वाहतूक वाढली आहे. सुसाट सुटणार्या वाहनांमुळे ग्रामस्थांना अपघातांची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे डायघर गावात प्रवेश केलेल्या वाहनांना गावकर्यांनी पुन्हा कल्याण शिळ रस्ता दाखवला आहे. तर गावातील रस्ता बाहेरील वाहनांना प्रवेश बंद केला असल्याचे जाहीर केले आहे.
कल्याण-शिळ रस्त्यावरील पलावा उड्डाणपुलाचे लोकार्पण झाल्यानंतर अन्य चौकांमध्ये वाहतूककोंडी वाढली आहे. यामुळे डोंबिवलीकडे निळजे चौक, काटई नाका, घारीवली, मानपाडा चौकात वाहतूककोंडी सुरू झाली आहे. तर शिळफाटाकडे देसाई नाका, डायघर, पडले आणि कल्याण फाटा चौकात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याण फाटा चौकात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शॉर्टकट कल्याण फाटा गाठण्यासाठी थेट डायघर गावातील रस्ता वाहनचालकांकडून वापरात येत होता. परंतु डायघर गावातून रस्त्याचा वापर करत असणार्या वाहनांचा ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शाळेतील विद्यार्थी, अंगणात खेळणार्या लहानग्यांचा वेगवान वाहनांच्या प्रवासामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांसाठी आवश्यक असणारे शॉर्टकटस देखील बंद झाल्याने कल्याण फाटा क्रॉस करतानाच दमछाक करावी लागणार आहे.
गावातील रस्ते वाहतूककोंडीत हरवले
गावाबाहेरील येणार्या वाहनांच्या रांगांमुळे ग्रामस्थ त्रासले आहेत. नवरात्रोत्सव सुरु असल्याने सायंकाळच्या सुमारास गावातील रस्ते वाहतूककोंडीत हरवलेल्या स्थितीत असतात. त्यामुळे ग्रामस्थांनी गावात सोसायट्यांमधील वाहनचालकांना स्टिकर लावण्याच्या सूचना केल्या असून वाहनामधून कल्याण शीळ रस्त्यावर जाणारी वाहतूक पूर्णता रोखली आहे.