

ठाणे : मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा स्टेशनदरम्यान 9 जून रोजी सकाळी गर्दीच्या वेळी अपघात होऊन 5 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर, आठ प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात काळी बॅग पाठीला अडकवलेल्या प्रवाशामुळे झाला होता, असे मध्य रेल्वेने म्हटले होते. याप्रकरणाची 3 महिन्यांहून अधिक काळ चौकशी झाल्यानंतर तयार केलेल्या प्राथमिक अहवालातही मध्य रेल्वेने काळ्या बॅगचेच कारण दिले असून, अपघाताचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे.
यावर्षी जूनमध्ये झालेल्या मुंब्रा लोकल अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू तर आठ प्रवासी जखमी झाले होते. आता हा अपघात प्रवाशाच्या बॅगमुळे झाल्याचे समोर आले असून, मध्य रेल्वेच्या चौकशी समितीने याला दुजोरा दिला आहे. या खुलास्यानंतर लवकरच अहवाल तयार करून तो मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे सादर केला जाणार आहे.
या दुर्दैवी अपघातानंतर प्रवाशांमध्ये शंका व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी मध्य रेल्वेने पाच वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी समिती नेमली होती. प्राथमिक निष्कर्षानंतर जवळपास तीन महिने उलटल्यावर आता समितीकडून रेल्वे प्रशासनाकडे अहवाल सादर केला जात आहे. या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांची एक समिती स्थापन करण्यात आली होती. यासाठी समितीने घटनास्थळी भेट दिली. तसेच, जखमींसोबतच काही प्रत्यक्ष दर्शींचे जबाब नोंदवले.
मुंब्रा, दिवा, ठाणे, टिटवाळा आणि कसारा अशा विविध स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया, ई-मेल आणि मोबाइल कॅमेर्यांद्वारे जनतेने दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानुसार प्राथमिक अहवाल तयार करण्यात आल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले. ट्रेनच्या खिडकीच्या ग्रिलवर बॅग आदळल्याने घर्षणाच्या खुणा आढळून आल्या.
अहवालानंतर आता निर्माण होणारे प्रश्न
1. मुंब्र्याजवळचे वळण धोकादायक नाही का? या वळणावर अप आणि डाऊन दिशेनं जाणार्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर कमी होते हे रेल्वे प्रशासनाला मान्य नाही का ?
2. घटना घडली तेव्हा फूटबोर्डवर उभ्या असणार्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त 0.75 मीटर अंतर होते.या टप्प्यात अत्यंत वेगात आलेल्या ट्रेन एका बाजुला झुकतात हे देखिल प्रशासनाला मान्य नाही का?
3. या ठिकाणी दोन वळणदार रूळ आहेत. रेल्वेच्या दोन्ही ट्रॅकमधील अंतर ट्रॅकच्या मध्यापासून 5.3 मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूंपासून 3.6 मीटर असते. विशिष्ट टप्प्यात दोन्ही ट्रेन समोरून आल्यानंतर अंतर कमी होत नाही का?
नेमके अपघाताच्या दिवशी काय घडले?
घटनेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकलमधून 2 प्रवासी आणि कसारा - सीएसएमटी लोकलमधून 6 प्रवासी जलद मार्गदरम्यान पडले. तसेच, सीएसएमटी दिशेच्या लोकलमध्ये 5 प्रवासी आणि कसारा दिशेच्या लोकलमधला 1 प्रवासी लोकलच्या आतमध्ये पडून जखमी झाला. कर्जत दिशेच्या ट्रेनमधला प्रवासी बॅग घालून पायदानावरून प्रवास करत होता. या प्रवाशाची बॅग सीएसएमटी दिशेच्या लोकलच्या दुसर्या आणि तिसर्या डब्याच्या पायदानावरून प्रवास करणार्या प्रवाशाच्या बॅगला घासली गेली. त्यामुळे हा अपघात घडला. त्या प्रवाशाच्या बॅगची जाडी सुमारे 30 सेमी होती.