

टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळा आणि परिसर पुन्हा एकदा पाणीटंचाईच्या सावटाखाली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काळू नदीवरील के. टी. बंधाऱ्याची दुरवस्था आणि दरवाजे न बसवल्याने टिटवाळा गणेशमंदिर परिसरासह मांडा भागातील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाटबंधारे विभाग आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला अनेक वेळा लेखी कळवूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने काळू नदीतील पाणी विनाकारण वाहून जात आहे. दरवाजे बसवले नसल्याने पाण्याची पातळी घटत असून, बंधाऱ्याच्या दोन्ही काठांवर कोरडेपणा जाणवू लागला आहे.
यामुळे टिटवाळा व मांडा परिसरात लवकरच गंभीर पाणीटंचाई ओढवेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. मोडकळीस आलेला बंधारा परिसरात पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असून, गळतीमुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे नियमित पुरवठा विस्कळीत झाला आहे.
बंधाऱ्याची उंची वाढवावी
माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत ठाणे जलसंपदा विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्याची मागणी केली आहे. “2012 मध्येच या ठिकाणी डॅम उभारण्याची मागणी केली होती. जर बंधाऱ्याची उंची वाढवली, तर टिटवाळा-मांडा परिसरातील पाणीपुरवठ्याची समस्या कायमची सुटेल,” असे ते म्हणाले.
सोमवारी बैठक
महापालिकेचे डेप्युटी इंजिनिअर सुळेभाविकार यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांनी आवश्यक पत्रव्यवहार केला असून त्या ठिकाणाची पाहणी करण्यात आली आहे. येत्या सोमवारी या विषयावर बैठक होऊ न बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.