

ठाणे ः सायकलस्वारी आणि फिटनेसची आवड असलेल्या ठाण्यातील ऋषिकेश आणि श्रध्दा सोनार या दाम्पत्याने 10 दिवसात दिल्ली ते ठाणे असे सुमारे 1400 किलोमीटर सायकलवारी केली. या सायकल मोहीमेद्वारे त्यांनी फिटनेस राखण्याचा संदेश दिला. ही मोहीम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून फत्ते केली.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथे वास्तव्यास असलेले ऋषिकेश आणि श्रध्दा सोनार यांना सायकलिंगची आवड आहे. दोघांनी यापूर्वी ठाणे ते सौराष्ट्र (गुजरात), 400 किलोमीटर दोन दिवसांत, 600 किलोमीटर ठाणे ते गोवा, बेंगलोर ते ठाणे(1 हजार किलोमीटर) असी सायकलवारी केली गेल्या 3 वर्षांत केली आहे. 31 ऑक्टोबरपासून दिल्लीतील इंडिया गेट पासून सुरू झालेल्या या मोहिमेची सांगता रविवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे झाली.
यंदा त्यांनी देशाची राजधानी दिल्ली ते महाराष्ट्राची राजधानी मुंबई अशी सायकलवारी केली. या मोहिमेस त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील इंडिया गेट पासून प्रारंभ केला. पहिल्या दिवशी 157 किलोमीटर (राजस्थान), दुसऱ्या दिवशी135, तिसऱ्या -1500, चौथ्या - 126, पाचव्या - 138, सहाव्या -161, 7व्या दिवशी 150, आठव्या दिवशी 155 तर नव्या दिवशी 155 किलोमीटरचे अंतर पार केले. हे दाम्पत्य 40 वर्षांचे आहे.
याबाबत दैनिक पुढारीशी बोलताना ऋषिकेश सोनार म्हणाले, आम्ही नियमित सायकलिंग आणि धावण्याचा सराव करतो. फिटनेस ही काळाची गरज आहे. आमच्या दिल्ली ते मुंबई सायकलस्वारीच्या प्रेरणेमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होताच, पण शत्रूचा ससेमिरा असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीवरून रायगड गाठले. ते तंदूरूस्त असल्याने मोहीमा फत्ते करत. त्यामुळे आमच्या या मोहीमेचा उद्देश तंदूरस्त रहा, तब्येत सांभाळा असा संदेश आम्ही दिला, तसेच महाराष्ट्र गीतातील दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... या महाराष्ट्राचा गौरव सांगणार्या ओळीचेही स्मरण होते. या मोहिमेत आम्हाला अवकाळी पाऊस आणि उन्हाचा सामना करावा लागला, पण आमच्या उद्देशापुढे या अडचणी आम्हाला किरकोळ वाटल्याचे सोनार दाम्पत्याने नमूद केले.