

ठाणे : दिलीप शिंदे
ठाणे कारागृह म्हणजे 295 वर्षांपासूनचा मराठेशाही आणि स्वतंत्र लढ्यातील क्रांतिकारक, राजबंद्यांचा चालता बोलता इतिहास आहे. याच ऐतिहासिक ठाणे किल्ल्यातील मध्यवर्ती कारागृह बंद करून त्याजागी पार्क उभारण्याचा बिल्डरधार्जिणा निर्णय राज्य सरकारने घेत कारागृहाच्या स्थलांतराच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
कारागृहातील सर्व नवीन बांधकामांना दिलेल्या परवानग्या, प्रशासकीय मान्यतांना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच स्थागिती दिल्याने आ. संजय केळकर यांनी पत्र पाठवून ठाण्याची अस्मिता वाचविण्यासाठी जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली.
ठाणे किल्ला हा 1730 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला व मार्च 1737 मध्ये मराठा साम्राजातील सरदार चिमाजी अप्पा यांनी किल्ला काबीज करून ठाणे परिसर पोर्तुगीजमुक्त केला. पुढे डिसेंबर 1744 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला सर केला. याच किल्ल्यात 1816 मध्ये पेशवाईचे कारभारी त्र्यंबकजी डेंगळे यांना बंदिवान म्हणून ठेवण्यात आले. या किल्ल्यातील कारागृहातून अतिशय हुशारीने पळणारे पहिले कैदी म्हणूनही डेंगळे यांच्या नावाची नोंद आहे. ब्रिटिशांनी किल्ल्यातील अंतर्गत रचना बदलून 1833 मध्ये किल्ल्याचे रूपांतर पूर्णपणे कारागृहात केले.
1844 मध्ये जिल्हा न्यायाधीश तुरुंगाच्या पाहणीसाठी आले असताना, कैद्यांनी त्यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 1876 मध्ये तुरुंगाचा कायापालट करण्यात आला आणि स्वातंत्र्यानंतरही ठाणे कारागृह हा इतिहासाची, क्रांतीची साक्ष देत उभा आहे. कारागृहाची कैदी क्षमता 1 हजार 105 अशी असताना तब्बल 4,404 कैदी ठेवले जात असून ठाणे जिल्हा न्यायालय, कारागृहाजवळ असल्याने कैद्यांची ने-आण करणे सोपे व सुरक्षित आहे. अशावेळी हे कारागृह 20-25 किमी दूर भिवंडी-पडघा येथे स्थलांतरित केले जात आहे. त्यानुसार सरकारने स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्पर पोलीस महासंचालक व महा निरीक्षक कारागृह व सुधार सेवा यांना लेखी पत्र पाठवून कारागृहातील सर्व नवीन बांधकामांस मनाई केली आहे.