

मुंबई : राज्यातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या (एमबीबीएस व बीडीएस) प्रवेश प्रक्रियेला अखेरीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास सर्वच जागा भरल्या गेल्या आहेत. खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या जागा फुल्ल तर एकूण जागापैकी एमबीबीएसमध्ये 46 तर बीडीएसमध्ये केवळ 22 जागा रिकाम्या राहिल्या आहेत.
पहिल्या यादीत राज्यातील एमबीबीएसच्या 8 हजार 138 जागांपैकी 8 हजार 106 जागांचे वाटप झाले होते. त्यापैकी केवळ 6 हजार 848 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. तब्बल 1 हजार 257 विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळूनही तो नाकारला, तर 1 हजार 291 जागा रिक्त राहिल्या. सरकारी महाविद्यालयांत 4 हजार 920 जागा होत्या, त्यातील 4 हजार 887 जागांचे वाटप झाले. मात्र 4 हजार 417 विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला, तर 469 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला.
खासगी महाविद्यालयांत 3 हजार 219 जागांचे वाटप झाले, त्यापैकी 2 हजार 431 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि 788 विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला होता. आता दुसरी फेरीअखेर राज्यातील 8 हजार 305 एमबीबीएस जागांपैकी तब्बल 8 हजार 259 जागांवर प्रवेश निश्चित झाला आहे. केवळ 46 जागा रिक्त राहिल्या आहेत.
बीडीएस अभ्यासक्रमातही 2 हजार 718 जागांपैकी 2 हजार 696 जागा भरल्या गेल्या असून फक्त 22 जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या सर्व जागा भरल्या गेल्या आहेत.
या फेरीअखेर एमबीबीएसच्या 8 हजार 305 जागांपैकी 8 हजार 259 जागा भरल्या गेल्या असून फक्त 46 जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याचप्रमाणे बीडीएसच्या 2 हजार 718 जागांपैकी 2 हजार 696 जागांवर प्रवेश निश्चित झाला असून फक्त 22 जागा रिक्त राहिल्या आहेत.
सुरुवातीच्या फेर्यांत हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारल्याने जागा रिक्त राहिल्या होत्या. या फेरीत प्रवेशाची गती वाढली आणि अंतिम टप्प्यात फारच मोजक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व एमबीबीएस जागा भरल्या गेल्या आहेत, तर बीडीएसमध्ये शासकीय आणि खासगी मिळून काही मोजक्या जागाच शिल्लक आहेत.