

मुंब्रा: निसर्गाची कत्तल करून काँक्रीटचे जंगल उभारले जात आहे; भ्रष्ट राजकारणी, ठेकेदार आणि सरकारी बाबूंच्या कारभारात पर्यावरणाचा बळी जात असताना सर्वसामान्य ठाणेकर मात्र उकाड्याने हैराण झाले आहेत. तापमान ३८ अंशांवर, मध्यरात्रीही ३० ते ३१ अंशांची धग; वृक्षतोड, वाढते काँक्रीटीकरण आणि भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांचा श्वास कोंडला आहे.
एकेकाळी हिरवाईने नटलेल्या आणि तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यात इमारती, रस्ते आणि विविध प्रकल्पांमुळे मोकळ्या जागा कमी होत आहेत.
झाडांची घटती संख्या आणि वाढते काँक्रीटीकरण यामुळे उष्णता साठून राहते. परिणामी, दिवसासोबत रात्रीही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
प्रकल्पांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीत पर्यावरणीय नियमांचे पालन होते का, याची तपासणी आवश्यक आहे. केवळ वृक्षारोपणाच्या घोषणा नकोत, तर लावलेली झाडे जगवणे आणि हरित क्षेत्रांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
विकासकामांच्या मंजुरीपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंत प्रशासनाने पर्यावरणीय जबाबदारी पार पाडली पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी सांगितले.
विकासकामांतील अनियमितता, नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबत पारदर्शकता आवश्यक आहे.
भ्रष्ट राजकारणी, ठेकेदार आणि सरकारी बाबू यांच्या कारभाराची योग्य तपासणी करून गैरप्रकार आढळल्यास दोषींवर कारवाई झाली पाहिजे. पर्यावरणाच्या नुकसानीकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे.
महापालिकेने कृती आराखडा तयार करणे आवश्यक
झाडे आणि मातीच्या जागा कमी झाल्याने शहरातील उष्णता वाढण्यास मदत होते. काँक्रीट आणि डांबर दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि रात्री ती बाहेर सोडतात. त्यामुळे मध्यरात्रीही उकाडा जाणवतो.
याचा नागरिकांच्या झोपेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वृक्षसंवर्धन, मोकळ्या जागांचे संरक्षण, तलावांचे जतन आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपाय आवश्यक आहेत. वाढत्या तापमानाचा अभ्यास करून महापालिकेने उष्णता कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.