

ठाणे : पावसाळ्यात दुर्गम आणि जोखीमग्रस्त गावपाड्यांतील गरोदर मातांना वेळेत आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी ठाणे जिल्हा आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन पूर्ण केल्याचा दावा केला आहे. मुसळधार पाऊस, रस्ते खंडित होण्याची शक्यता आणि वाहतुकीतील अडथळे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने प्रत्येक गरोदर मातेसाठी स्वतंत्र संदर्भ सेवा, रुग्णवाहिका व्यवस्था आणि प्रसूतीपूर्व नियोजन तयार केले असून संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी या उपक्रमातून ग्रामीण व आदिवासी भागांतील आरोग्य सुविधांच्या मर्यादाही पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील अनेक दुर्गम गावपाड्यांमध्ये आजही पक्क्या रस्त्यांचा अभाव, मर्यादित आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांपर्यंत पोहोचण्यातील अडचणी कायम आहेत. त्यामुळे जोखीमग्रस्त गावपाड्यांमध्ये राहणाऱ्या गरोदर मातांची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. त्यांच्या अपेक्षित प्रसूती दिनांकानुसार सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.
अंबरनाथ तालुक्यात ५, भिवंडीमध्ये २६, कल्याणमध्ये ३३, मुरबाडमध्ये २० आणि शहापूरमध्ये ४२ अशा एकूण १२६ गरोदर माता १७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ४६ दुर्गम गावपाड्यांमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र, या मातांसाठी स्वतंत्र संदर्भ सेवा आराखडा तयार करण्याची वेळ येत असल्याने दुर्गम भागांतील आरोग्य व्यवस्थेची वास्तविक स्थिती पुन्हा समोर आली आहे.
अनेक गावपाड्यांमध्ये आजही प्राथमिक आरोग्य सुविधा मर्यादित असून, प्रसूतीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत महिलांना लांबच्या आरोग्य केंद्रांवर अवलंबून राहावे लागते. याच कारणामुळे प्रशासनाने अपेक्षित प्रसूती दिनांकाच्या किमान एक महिना आधी गरोदर मातांनी प्रसूती केंद्राजवळील नातेवाईकांकडे किंवा माहेरी स्थलांतरित व्हावे, अशा सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागातच सुरक्षित प्रसूतीची व्यवस्था उपलब्ध असती, तर अशा प्रकारच्या स्थलांतराची गरज भासली नसती, अशी चर्चा आरोग्य क्षेत्रात होत आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी मुसळधार पाऊस, रस्ते बंद होणे किंवा दुर्गम भागातील संपर्क तुटल्यास या सेवा कितपत वेळेत पोहोचतील, याबाबत प्रश्न कायम आहेत. त्यामुळेच पर्यायी व्यवस्था म्हणून खासगी रुग्णवाहिकांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचे नियोजन तालुका आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
दुसरीकडे, प्रत्येक गरोदर मातेचा अपेक्षित प्रसूती दिनांक, संदर्भ रुग्णालय, वाहतूक व्यवस्था, आशा स्वयंसेविकेचा संपर्क आणि आपत्कालीन नियोजन यांची माहिती आधीच तयार करण्यात आली आहे. संभाव्य धोके कमी करण्यासाठी प्रशासनाने यंदा अधिक सक्रिय भूमिका घेतल्याचे यातून दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्व तालुका आरोग्य यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, एकाही गरोदर मातेला प्रसूतीसाठी अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक समन्वय राखण्याचे निर्देश दिले आहेत.