

ठाणे : कल्याण - शीळ महामार्गावरील देसाई खाडीच्या उड्डाण पुलाखाली सुटकेमध्ये एका २२ वर्षीय महिलेचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. त्या महिलेच्या मारेकराचा ठाणे पोलिसांनी सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या साह्याने २४ तासात छडा लागून विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (५०) या आरोपीला बेड्या ठोकल्या.
भीक मागणाऱ्या मृत तरुणीला पाच वर्षापूर्वी आरोपीने मुंब्रा स्थानकातून आपल्या घरी आणले होते. तेव्हापासून ते दोघे जण एकाच घरात राहत होते. मात्र किरकोळ कारणावरून सुरु झालेले भांडण विकोपाला गेले आणि रागाच्या भरात गळा दाबून तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली.
मृत प्रियंका विश्वकर्मा ही ठाण्यातील देसाई गावात गेल्या पाच वर्षांपासून आरोपी विनोद विश्वकर्मा याच्या घरी राहत होती. मूळची उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील प्रियंका ही १७ वर्षाची असताना ठाण्यात आली. ती विनोदसोबत सुखाने राहत होती. त्यांच्यात अधूनमधून किरकोळ भांडण होत असे. मात्र २१ नोव्हेंबरला दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की आरोपी विनोद ह्याने तिचा गळा दाबला. ती मृत लक्षात येताच त्याने तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये ठेवला. एक दिवस ती सुटकेस तशीच घरी ठेवली.
२४ तासानंतर मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्याने आरोपीने २२ नोंव्हेंबरला रात्रौ साडे अकरा ते बाराच्या सुमारास ती मृतदेह असलेली ट्रॉली बॅग तशीच रस्त्याने चालत नेऊन देसाई खाडी पुलावरून सुटकेस खाली फेकून दिली होती. पुलावरून सुटकेस खाली पडल्याने त्यातील मृतदेहाचे काही भाग बाहेर पडले. याची माहिती २४ नोव्हेंबरला एका व्यक्तीने ठाणे पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी शीळ - डायघर पोलीस ठाण्यातील पोलीस पोहचले आणि तपास सुरु झाला.
त्या मृत महिलेची कोणतीही माहिती पोलिसांकडे नव्हती. पोलिसांनी सोशल मीडियावर बातमी प्रसारीत केली आणि एका व्यक्तीने संबंधित महिलेची माहिती अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांना दिली. त्यानंतर सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधून काढले आणि २४ तासात त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी आरोपीला पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सुरु आहे. त्या दोघांमधील कोणत्या स्वरूपाचे संबंध होते, याची अधिक माहिती नसून केवळ भांडणातून हत्या केल्याची आरोपी सांगत असल्याचे शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांनी सांगितले. पोलिसांच्या या कामगिरीचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.