

Ghodbunder Road heavy vehicles issues
ठाणे : घोडबंदर रोडवरील होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेत घोडबंदर रोडवर दिवसा अवजड वाहने बंद करण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांना दिले. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे नागरिकांना वाटले होते. मात्र तीन दिवस उलटले तरी वाहतूक पोलिसांनी तशी अधिसूचना न काढल्याने अवजड वाहने धावत आहेत.
घोडबंदर सेवा रस्त्याच्या मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत दिवसा या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक थांबवणे आवश्यक आहे. तरच नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळू शकेल. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांना मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी द्यावी. त्याबदद्लची अधिसूचना काढण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते.
मात्र, वाहतूक पोलिसांनी मंत्र्यांच्या निर्देशाकडे दुर्लक्ष केले असून घोडबंदर रोडवर दिवसभर अवजड वाहने धावत असल्याचे दिसून येतात. याचा फटका प्रवाशांना बसत आहेत. अगोदर रस्ता खड्ड्यात हरवला असताना अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी अधिकच वाढत आहे. मंत्र्यांनी आदेश देऊनही वाहतूक पोलिसांकडून अवजड वाहनांवर बंदी घालण्यास कारवाई झालेली नाही. त्याचा फटका नागरिकांना बसत असून गणपतीच्या उत्सवात वाहतूक कोंडी अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.