

नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील भात पिकाची लागवड केलेल्या शेतकर्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. जिल्ह्यातील शहापूर नंतर अंबरनाथ तालुक्यात बगळा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. अचानक आलेल्या रोगामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगड भागात असलेल्या मांगरूळ गावच्या हद्दीत या रोगाने थैमान घातले आहेत. पिकांची कणसं नष्ट करून पीक सफेद रंगाचे झाले असल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे मुसळधार पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे शेतकर्यांना नवनवीन आव्हानांना यंदा तोंड द्यावं लागत आहेत. रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अंबरनाथ तालुक्यातील शेतकर्यांसाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तो नष्ट करण्यासाठी शेतकर्यांची धावपळ सुरु असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. कोकण प्रांतातील भात शेतीला बगळा जातीच्या रोगाने ग्रासले आहे. ठाणे जिल्हातील शहापूर नंतर अंबरनाथ तालुक्यात या रोगाचे अंश दिसून आले आहेत. मलंगगड रोड वरील मांगरूळ गावच्या भात शेतात रोगाने पिकाचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष बाब म्हणजे हा रोग आजूबाजूच्या शेतात देखील प्रवेश करत असल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
काय आहेत सूचना?
शेतात पाणी बांधून पिकावर काथ्याचा दोर धरून 2-3 वेळा पिकावरून फिरवावा नंतर पाणी एका कोपर्यातून सोडून द्यावे व तेथे कापड लावून वाहून आलेल्या सुरळ्या, अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतात पक्षी थांबे उभे करावेत. प्रकाश सापळ्यांचा वापर करावा, गुंडाळीग्रस्त पाने आळ्या सकट काढून नष्ट करावीत.
कारटॅप हायड्रोक्लोराइड 50 टक्के, 12 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतकर्यांसमोर संकट
यंदा शेतकर्यांना वाढलेल्या बियाण्याच्या दरांसह नवनवीन संकटाना तोंड द्यावं लागलं आहे. तर वेळेआधी आलेल्या पावसाने पेरणी केल्यानंतर थैमान घातले होते. भाताची पेरण्या केल्यानंतर झालेल्या मुसळधार पावसात पेरलेले बियाणं देखील पाण्यात वाहून गेलं होत. शेतकर्यांनी लागवड केलेल्या भात पिकाला बगळ्या जातीच्या रोगाने ग्रासले आहे. त्यामुले या रोगाच्या प्रादुर्भावातून पीक वाचविण्यासाठी अंबरनाथ तालुका कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून शेतकर्यांना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.