

ठाणे : परवान्यात समाविष्ट नसलेला व विक्रीसाठी बंदी असलेल्या बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्यांच्या विरोधात थेट गुन्हे दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. कृषी क्षेत्राचे बळकटीकरण करण्याबरोबरच खासदार आणि आमदारांनी एक गाव निवडून त्याठिकाणी सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत, मॉडल गाव तयार करावे अशा सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील जिल्हा नियोजन भवन येथे शुक्रवारी (दि.16) आयोजित खरीप हंगाम २०२५ आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील शेतीच्या उत्पादनाचा आढावा घेतला. शेती क्षेत्राचे बळकटीकरण कसे करता येईल, शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेत येईल यासाठी प्रयत्न व मार्गदर्शन करण्याच्या सूचना जिल्हा कृषी विभागाला दिल्या.
जिल्ह्यात एक एकर पेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. तर, त्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्याचे गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे असे प्रयत्न करून गट शेतीला प्राधान्य देण्याचे देखील शिंदे यांनी यावेळी सांगितले. मोगरा, चाफा यांसारख्या फुलशेतीला देखील प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच शेतकऱ्याला शेत मालातून चांगले उत्पन्न मिळावे, हेच पंतप्रधान आणि महायुती सरकारचे धोरण असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सुरण या पिकाचे उत्पादन घेतल्यास त्यातून शेतकऱ्यांना देखील चांगले उत्पन्न मिळेल. त्यामुळे जिल्ह्यात सुरण शेतीला देखील भर देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी १५० एकर मध्ये सुरणचे पिक लागवड करण्यात येणार असून शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी दिली.
सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त खतांचा वापर सर्रसपणे होत आहे. त्यामुळे कर्करोगासारखे आजार अधिक बळावत आहे. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्यावर भर देण्यात यावा, शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती बाब जनजागृती करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. खासदार आणि आमदार यांनी प्रत्येकी एक गाव निवडावे, त्या ठिकाणी केवळ सेंद्रिय शेती करण्यात येणार असून त्या आशयाचे फलक देखील लावण्यात यावे, तसेच सेंद्रिय शेतीसाठी डीपीडीसीतून एक योजना तयार करून त्यातून निधी देता येईल, असे देखील शिंदे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी वन विभाग, कृषी विभाग यांनी मिळून ९०० हेक्टर क्षेत्रावर बांबूची शेती केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक रामेश्वर पाचे यांनी दिली. तसेच यंदा ५०० हेक्टरवर बांबूची शेती करण्यात येत असल्याचे माहिती पाचे यांनी दिली. मात्र केवळ ५०० हेक्टरवर बांबूची लागवड न करता बांबूचे क्षेत्र वाढवण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.