

Eknath Shinde
ठाणे : घोडबंदर मार्गावरील गायमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. गायमुख रस्त्याचे पुन्हा डांबरीकरणच का केले असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारल्यानंतर वन विभागांकडून काँक्रिटीकरणासाठी परवानगी दिली जात नसल्याची माहिती सा.बा विभागाकडून देण्यात आल्यानंतर लोकांच्या जिवापेक्षा तुम्ही मोठे नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोप सांगा, घोडबंदर रस्त्यावर सिमेंटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या, नाहीतर अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार, असे समजू नका की तुमच्या वर गुन्हे दाखल करणार नाही, तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करू असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यासंदर्भात वनमंत्र्यांशी देखील बोलणार असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवन या ठिकणी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गायमुख रस्त्याच्या दुरुस्तीची माहिती उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आली. गायमुख रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण का करण्यात आले ? असा प्रश्न या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला. यावर काँक्रिटीकरणासाठी वन विभागाची परवानगी नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्यानंतर वन विभागाच्या या भूमिकेबाबत त्यांनी संताप व्यक्त केला. ३.७ किमीचा रस्ता असून तो वनविभगाच्या अंतर्गत येत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. तर यांदर्भात वरिष्ठांशी बोलावे लागेल असे उत्तर बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मात्र वनविभागाचा चांगलाच समाचार घेतला.
यापूर्वी देखील गायमुख रस्त्याचे अनेकवेळा डांबरीकरण झाले आहे. हा रस्ता बराच वर्ष जुना रस्ता असून त्या ठिकाणी आता फॉरेस्ट न राहता तो आता शहरी भागात येत असून रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता अतिशय महत्वाचा असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणे आवश्यक असून लोकांच्या जिवापेक्षा तुम्ही मोठे नाही, तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोप सांगा, घोडबंदर रस्त्यावर सिमेंटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या, नाहीतर अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरणार असा सज्जड दमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनविभागाला दिला.
महायुतीच्या सरकारमध्ये वन खाते हे भाजपकडे असून सार्वजनिक बांधकाम खाते हे शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतच वनमंत्र्यांशी देखील बोलू अशी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली असली तरी,ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीमध्ये मात्र सरकारमधील या दोन खात्यांच्या कारभारातील असमन्वय मात्र दिसून आला.