

ठाणे : प्रवीण सोनावणे
मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ निस्तरा अशा सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्यानंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर आली आहे. ज्या ठिकाणी दुबार मतदार असल्याच्या हरकती आल्या आहेत अशा ठिकाणी आता प्रत्यक्ष जाऊन मतदारांची खात्री केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने विधानसभा निहाय ज्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच याद्या प्रभागांसाठी वापरण्यात आल्याने मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ समोर आला होता. आता त्याच निवडणूक आयोगाने दुबार मतदारांचा घोळ निस्तरा अशा सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
आगामी महापालिकांच्या निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र या याद्या सदोष असल्याचे यावरून पालिका प्रशासनावर चौफेर टीका करण्यात आली होती. केवळ ठाणेच नव्हे तर राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात हाच घोळ पाहायला मिळाला होता. गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्यांमधील घोळ निस्तरा अशा सूचना महापालिकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता ठाणे महापालिकेने देखील निवडणूक आयोगाच्या सूचना गांभीर्याने घेत सदोष मतदार याद्या सुधारण्यासाठी तातडीने पाऊले उचलली आहेत.
निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर तातडीने ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला निवडणूक विभागाचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दुबार मतदार आणि मतदार यादीमधील घोळ निस्तरण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.
15 डिसेंबरला पालिका निवडणुकांची घोषणा ?
मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सर्व पालिका आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सदोष मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात चर्चा करण्यात आली असली तरी,या बैठकीनंतर 15 डिसेंबर पर्यंत निवडणूक अयोग पालिका निवडणुकांची घोषणा करेल अशी चर्चा रंगली होती.
निवडणूक आयोगाच्या काय आहेत सूचना....
दुबार मतदारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करा अशी सूचना निवडणूक आयोगाकडून सर्व महापालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. आलेल्या हरकती आणि सूचनांवर लवकरात लवकर निरसन करा आणि कुठल्याही पद्धतीत मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे निवडणुकांची तारीख लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधील संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेऊन प्रत्यक्ष मतदानाच्या वेळीदेखील दक्षता घ्यावी; तसेच प्रारूप मतदार याद्यांवरील प्राप्त हरकती व सूचनांची पडताळणी करून वेळेवर निपटारा करावा. त्याचबरोबर प्रभागनिहाय मतदार यादी तयार करताना झालेल्या चुका निर्दशनास आल्यास तक्रारींचा वाट न पाहता स्वत:हून दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.
मतदार याद्यांमधील घोळ का ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी लागू असलेल्या अधिनियमांच्या तरतुदीनुसार भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांसाठी जशीच्या तशी वापरली जाते. तिचे केवळ महानगरपालिका निवडणुकासाठी प्रभागनिहाय विभाजन केले जाते. मतदार याद्यांचे विभाजन करताना विधानसभा मतदारसंघाच्या मूळ यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. त्यामुळे मतदारांचे प्रभाग बदलत असल्याचे समोर आले आहे.