

Rural Thane Fog
नेवाळी : ठाणे जिल्ह्यातील सर्वत्र भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी दररोज पावसाची संततधार सुरु देखील आहे. मात्र शनिवारी चक्क पाऊस गायब होऊन पहाटे नागरिकांना धुक्याची चादर पाहावयास मिळाली आहे. कल्याण पूर्वेतील ग्रामीण भागासह ठाणे तालुक्यातील परिसरात देखील धुक्याची चादर दिसून आली आहे. त्यामुळे वरून राजाचे आगमन होत असताना अचानक थंडीचे वातावरण निर्माण झाल्याने नागरिक देखील आश्चर्य चकित झाले होते.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात सतत अवकाळी पावसाचे आगमन सुरु आहे. दररोज जिल्ह्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसून येत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांना चक्क हवेतील थंडीचा आनंद घ्यायला मिळाला आहे. कल्याण पूर्वेतील मलंगगड भागात दूरवर धुक्याची चादर आणि हवेतील गारवा नागरिकांना अनुभवायला मिळाला आहे. तर कल्याण ग्रामीण भागात देखील परिस्थिती जैसे थे पाहावयास मिळालेली आहे.
ठाणे तालुक्यातील नारिवली वाकलन परिसरात प्रचंड धुक्याची चादर दिसून आली आहे. वरून राजाचे आगमन होत असताना अचानक थंडीची चाहूल ग्रामीण भागात लागल्याने सर्वाना आश्चर्याचा मोठा धक्का शनिवारच्या पहाटे जाणवू लागला आहे.
कधी उन्हाळा कधी पावसाळा तर कधी हिवाळा या सुरु असलेल्या वातावरणातील बदलांमुळे साथीचे आजार डोकं वर काढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी बाहेरील खाद्यपदार्थ टाळणे , पाणी उकळून प्यावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.