Thane Weather Update : कल्याण-डोंबिवलीवर पसरू लागली गुलाबी थंडीची चादर

ठाण्यात पारा आला 15 अंशांवर; कोठे किती तापमान?
 कल्याण-डोंबिवली, ठाणे
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली (छाया : बजरंग वाळुंज)
Published on: 
Updated on: 

डोंबिवली : एकीकडे विधानसभा निवडणुकांमुळे राज्यामध्ये राजकीय वातावरण तापलेले असतानाच दुसरीकडे वातावरणाचा पारा मात्र हळूहळू घसरताना दिसत आहे. गेल्या दोन-चार दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून मंगळवारी (दि.26) सकाळी इथला पारा थेट 15 अंशांपर्यंत घसरल्याचे दिसून आले. केवळ कल्याण-डोंबिवलीच नव्हे तर संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये तापमान लक्षणीयरित्या कमी नोंदले गेल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

Summary

एमएमआर रिजनमधील इतर शहरांचे तापमान

  • कल्याण : 15 अंश सेल्सिअस

  • डोंबिवली : 15.7 अंश सेल्सिअस

  • कर्जत : 13.5 अंश सेल्सिअस

  • बदलापूर : 13.6 अंश सेल्सिअस

  • अंबरनाथ : 14 अंश सेल्सिअस

  • उल्हासनगर : 14.6 अंश सेल्सिअस

  • पलावा : 14.5 अंश सेल्सिअस

  • पनवेल : 14.3 अंश सेल्सिअस

  • पालघर : 14.7 अंश सेल्सिअस

  • ठाणे : 16.6 अंश सेल्सिअस

  • नवी मुंबई : 16 अंश सेल्सिअस

गेल्या एक-दिड दोन महिनाभर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू होती. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर केल्या जाणाऱ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमुळे राजकारणाचा पारा चांगलाच वाढलेला दिसून आला. मात्र मतदानाच्या दिवशीपासून म्हणजेच साधारणपणे 20 तारखेपासून भौगोलिक तापमानामध्ये काहीशी घसरण जाणवत होती. अवघ्या आठवड्याभराच्या कालावधीत कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये यंदाच्या मोसमातील नोव्हेंबर महिन्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्याचे अभिजीत मोडक यांनी सांगितले. येत्या एक-दोन दिवसांमध्ये हेच तापमान आणखी कमी होणार असून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत असेच तापमान राहील, असाही अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी वर्तवला. मंगळवारी कल्याणमध्ये 15 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत 15.7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.

कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या शहर व ग्रामीण भागात सद्या अतिशय आल्हाददायक वातावरण निर्माण झाले असून मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिकही गुलाबी थंडीच्या चाहुलीने सुखावले आहेत.

15 नोव्हेंबरनंतर आपल्याकडे थंडीची चाहूल जाणवते. एकीकडे कोरडी हवा, तर दुसरीकडे कमी झालेली आर्द्रता आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत हवा असल्याने रात्रीतून आपल्याकडे ही तापमानाची घट जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news