

ठाणे : दिलीप शिंदे
कळव्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांची ताकद कमी करताना भाजपचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढत्या महत्वाकांक्षेला एकप्रकारे ब्रेक लावून 'शिंदे रणनिती'ने आव्हाड नाईक यांना घायाळ केले आणि स्वबळावर निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचा संदेश मित्रपक्ष भाजपला दिल्याचे बोलले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार ते सहा महिन्यात निवडणुका होणार हे निश्चित झाल्याने राज्यातील साडेचारशे पेक्षा अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणूक होण्यासारखे असेल. इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ते कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची ताकद वाढविण्यासाठी रस्सीखेच सुरु झाली आहे. आयाराम गयारामासह महापालिका निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. विरोधकांचे पक्ष फोडण्याचा सपाटा सुरु झाला आहे. त्यातून ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सात नगरसेवकांना शिवसेनेने आपल्या भगव्या रंगात रंगवून आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला आहे. हे सात ही माजी नगरसेवक आव्हाड यांचे समर्थक असून त्यांच्यामुळे राष्ट्रवादीची संख्याबळ वाढलेली होती. त्यामध्ये मिलींद पाटील आणि प्रमिला पाटील ह्या माजी विरोधी पक्ष नेत्या म्हणून काम केलेले असून मनाली पाटील, महेश साळवी, मनीषा साळवी, सुरेखा पाटील, सचिन म्हात्रे यांचा समावेश आहे. युवा नेता मंदार केणी यांनी देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या आपल्या मित्राला साथ देण्याचा निर्णय घेतला. हे सगळे आव्हाडांचे विश्वासू होते.
आगामी महापालिका निवडणुकीत आव्हाड यांना हा मोठा धक्का मनाला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अधिक कमजोर झाला आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदार संघात या सात नगरसेवकांच्या प्रभागातील आव्हाड यांच्यासह आघाडीच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. अर्थात खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात मतदान झाले होते. त्यामुळे मिशन कळवा राबवून आव्हाड यांना कमजोर करण्याचे प्रयत्न सुरु झाले होते. अगोदरच मुंब्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडून आव्हाड यांना शह देण्याचा प्रयत्न झाला पण काही उपयोग झाला नाही, उलट आव्हाड यांचे मताधिक्य वाढले होते.
अशा बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये या पक्ष प्रवेशाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याची चर्चा रंगू लागली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांना महापालिका निवडणुकीत कमजोर करताना मित्र पक्ष भाजपलाही इशारा दिला आहे. शिवसेनेसोबत आता ७९ नगरसेवकांचे बळ आहे, तरी ही भाजपचे नेते वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिकेवर कमळ फुलविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. त्यांनी ठाण्यात जनता दरबार भरवून थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांना शह देण्यास सुरुवात केली आहे. स्वबळाचा नारा देऊन मंत्री नाईक यांनी मिशन कळवा राबिवण्यास सुरुवात केली होती. शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हे एकेकाळचे नाईक समर्थक आहेत. त्यांना आपल्या जुन्या संबंधाचा उपयोग करून भाजपमध्ये खेचण्याचा प्रयत्न सुरु होते. ही आगरी ताकद पुन्हा एकदा नाईक यांच्यासोबत आली असती तर कळव्यात पुन्हा भाजपाची ताकद वाढून शिवसेनेला शह देण्याची रणनीतीला आणखी बळ मिळाले असते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले डाव टाकत त्यांना भाजपमध्ये जाण्यापूर्वी शिवसेनेत घेतले. या प्रवाशामागे नक्कीच काही घडले असणार अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.