

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे नियोजन करताना प्रशासनाची होणारी दमछाक कमी करण्यासाठी आणि कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन व्हावे यासाठी प्रत्येक प्रभागाचा सर्व्हे करण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. प्रत्येक प्रभागात नेमक्या किती आस्थापना आहेत, किती हॉस्पिटल आहेत, किती गृहसंकुले आहेत, याची माहिती संकलित करण्यात येणार असून त्यानुसार कचरा संकलित करणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर एका प्रभागाचेच सर्व्हेक्षण करून ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1 हजार मेट्रिक टन पेक्षा अधिक कचरा जमा होतो. यामध्ये ओला, सुका आणि ई-कचऱ्याचा देखील समावेश आहे. दररोज निर्माण होणाऱ्या या कचऱ्यावर पूर्ण क्षमतेने प्रक्रिया करणे अजूनही ठाणे महापालिकेला जमलेले नाही. याशिवाय शहरात दररोज निर्माण होणारा कचरा संकलित करण्यावरूनही अनेकदा पालिकेवर टीका झाली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक प्रभागाचे सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या ठाण्यात विविध ठिकाणी जाऊन घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित केला जातो. मात्र एका प्रभागात नेमकी किती गृहसंकुले आहेत, किती हॉस्पिटल आहेत, किती आस्थापना आहेत याची इत्यंंभूत माहिती प्रशासनाकडे नाही. त्यामुळे या कचऱ्याचे संकलन करताना सर्वच कचरा गोळा केला जातो, हे निश्चितपणे सांगता येत नाही. संकलित न केलेला कचरा या आस्थापनांकडून किंवा इतरांकडून अन्य ठिकाणी टाकला जातो. यासाठी हे सर्व्हेक्षण महत्वाचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण 33 प्रभाग असले तरी प्रायोगिक तत्वावर केवळ एकाच प्रभागात सर्व्हेक्षणाचा प्रयोग करण्यात येणार असून त्यानंतर शहरातील सर्व प्रभागांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.