Thane Cyber Fraud: सायबर भामट्यांचा सुळसुळाट; ठाणेकरांचे ४.५३ कोटी संकटात

डिजिटल जाळ्यात हजारो ऑनलाइन व्यवहारांत फसवणूक
Cyber Fraud
Cyber Fraud pudhari News
Published on: 
Updated on: 

सुरेश साळवे

ठाणे: ऑनलाईन व्यवहारांच्या वाढत्या वापरासोबत सायबर भामट्यांनी ठाणेकरांना अक्षरशः जाळ्यात ओढले आहे. वीज कनेक्शन खंडित होणार, केवायसी अपडेट करा, लिंक उघडा, खाते बंद होईल अशा वेगवेगळ्या आमिषांना नागरिक बळी पडत असून ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या पाच परिमंडळांत तब्बल ४.५३ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

यातील १.२५ कोटी रुपये परत मिळवण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर विभागाला यश आले असून ४ हजार २१८ व्यवहारांमधील २ कोटी ४५ लाख ७२ हजार रुपये परतीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती सायबर विभागाने दिली आहे.

Cyber Fraud
JJ Hospital Mumbai: 'जेजे सुपर स्पेशालिटी'ची सात वर्षांनंतरही प्रतीक्षाच

सायबर गुन्हेगारांकडून आता केवळ मोठ्या रकमेवर डल्ला मारण्याऐवजी छोट्या-छोट्या रकमा हडपण्याचा फंडा वापरला जात आहे. वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देणारे संदेश, केवायसीच्या नावाखाली येणारे फोन, बनावट लिंक आणि एपीके फाईल उघडण्यास भाग पाडणे अशा प्रकारांतून नागरिकांना लक्ष्य केले जात आहे.

एका चुकीच्या क्लिकने किंवा ओटीपी शेअर केल्याने खात्यातील रक्कम काही क्षणांत गायब होत असल्याने सायबर गुन्हे ठाणे पोलिसांसमोरील नवे आव्हान ठरत आहे. ठाणे आयुक्तालयातील परिमंडळ-१ मध्ये १ हजार २७७ व्यवहारांतून ७७ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाली असून त्यापैकी २६ लाख २२ हजार रुपये परत मिळवण्यात आले.

परिमंडळ-२ मध्ये २६७ व्यवहारांत २६ लाख ५६ हजार रुपयांची फसवणूक झाली असून ६ लाख २६ हजार रुपये परत मिळाले. परिमंडळ-३ मध्ये २ हजार ४४१ व्यवहारांतून १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्यातील ३२ लाख ९० हजार रुपये परत मिळवण्यात आले.

Cyber Fraud
Mumbai Hawkers: ओळखपत्रे मिळाली तरी फेरीवाल्यांना द्यावा लागतोय हप्ता; पालिका व पोलीसांच्या दररोजच्या त्रासामुळे फेरीवाले संतप्त

परिमंडळ-४ मध्ये १ हजार ११३ व्यवहारांत ७७ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक झाली असून १६ लाख ४४ हजार रुपये परत मिळाले. तर परिमंडळ-५ मध्ये २ हजार ७१५ व्यवहारांतून १ कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक झाली असून त्यातील १० लाख १६ हजार रुपये परत मिळवण्यात ठाणे गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांना यश आले आहे. पाचही परिमंडळांमध्ये मिळून ४.५३ कोटींच्या फसवणुकीतील १.२५ कोटी रुपये परत मिळाले आहेत.

‘डिजिटल अरेस्ट’ला घाबरू नका!

सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका लक्षात घेता ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. खात्री न करता ऑनलाईन व्यवहार करू नये, पासवर्ड अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये, ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने धमकावणाऱ्या बनावट पोलिसांच्या कॉलला घाबरू नका, फसवणूक झाल्यास तक्रार करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news