JJ Hospital Mumbai: 'जेजे सुपर स्पेशालिटी'ची सात वर्षांनंतरही प्रतीक्षाच

ओसी, अग्निसुरक्षा, लिफ्ट-अग्निशमन यंत्रणेची कामे अपूर्ण; लिफ्ट आणि सरकते जिने पूर्णपणे कार्यान्वित होणे आवश्‍यक
JJ Hospital Mumbai
JJ Hospital MumbaiPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: जेजे रुग्णालय परिसरातील १० मजली सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन होऊन सात वर्षे उलटली, तरी रुग्णालय अद्याप रुग्णसेवेसाठी सुरू झालेले नाही. ‘ए’ आणि ‘बी’ या दोन्ही इमारतींचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असले, तरी भोगवटा प्रमाणपत्र (ओसी), अग्निसुरक्षा पूर्तता, लिफ्ट, सरकते जिने आणि अग्निशमन यंत्रणेसह काही कामे प्रलंबित आहेत.

त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या रुग्णालयासाठी रुग्णांना आणखी किती प्रतीक्षा करावी लागणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

JJ Hospital Mumbai
Mumbai Hawkers: ओळखपत्रे मिळाली तरी फेरीवाल्यांना द्यावा लागतोय हप्ता; पालिका व पोलीसांच्या दररोजच्या त्रासामुळे फेरीवाले संतप्त

जेजे रुग्णालय परिसरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर २०१९ मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि २०२० मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. २०२३ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, कोविड काळातील अडथळ्यांमुळे काम रखडले. त्यानंतर कंत्राटदाराला मुदतवाढ देण्यात आली.

तरीही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर बाह्यरुग्ण विभाग प्रस्तावित आहे.

त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांसाठी लिफ्ट आणि सरकते जिने पूर्णपणे कार्यान्वित असणे आवश्यक आहे. काही लिफ्ट बसविण्यात आल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. पावसाळ्यात लिफ्टमध्ये पाणी जाण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत.

JJ Hospital Mumbai
Mumbai Air Pollution Control: मुंबईकरांच्या श्वासावर धुळीचे संकट; २४ विभागांत २४० हॉटस्पॉटवर महानगरपालिकेची करडी नजर

७७८ कोटींचा प्रकल्प

सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाची किंमत ७७८.६५ कोटी रुपये आहे. त्यापैकी नागरी बांधकामासाठी ३६४.१० कोटी, साहित्य व सेवांसाठी ६९.४१ कोटी, विद्युत कामांसाठी २१३.४५ कोटी, तर इतर कामांसाठी १३१.६९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तब्बल सात वर्षांनंतरही रुग्णालय सुरू झाले नसल्याने प्रकल्पाच्या विलंबाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डॉक्टर म्हणतात, सुरक्षिततेशी तडजोड नको

नाव न छापण्याच्या अटीवर एका डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णालय सुरू करण्यासाठी इमारतीचे काम पूर्ण होण्याबरोबरच अधिकृत हस्तांतरण होणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी लिफ्ट, सरकते जिने, अग्निसुरक्षा आणि इतर मूलभूत सुविधा पूर्णपणे कार्यान्वित असणे गरजेचे आहे.

‘ए’ आणि ‘बी’ विंगसाठी आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर त्या भागातील सेवा सुरू करण्याबाबत पुढील प्रक्रिया करता येऊ शकते. मात्र, रुग्णांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करता कामा नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रवेशद्वाराभोवती १७० अतिक्रमणे

रुग्णालयाच्या गेट क्रमांक दोनच्या परिसरात अतिक्रमणे झाली आहेत. येथील सुमारे १७० अतिक्रमणांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया सुरू असून, सार्वजनिक सूचना देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याबाबत महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागालाही माहिती देण्यात आली आहे. अतिक्रमण हटविताना पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news