

उल्हासनगर : उल्हासनगर लगतच्या खडेगोलवली गावातून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह एका तरुणाला उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली. हे गावठी पिस्तूल त्याने कुठून मागविले याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कल्याण मधील खडेगोळवली गावात राहणारा अमित तिलकराम चौधरी याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार गणेश गावडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्या आधारे परिसरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश गावडे, हवालदार राजेंद्र थोरवे, हवालदार चंद्रकांत सावंत, हवालदार रितेश वंजारी, हवालदार सुरेश जाधव यांच्या पथकाने सापळा रचून अमित चौधरी याला अटक केली. चौकशीत त्याच्या घरातून देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.