

ठाणे: ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अमली पदार्थाच्या तस्करीचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे. गोल्डन डाईज नाक्यावर दोन वाहतूक कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून पकडलेल्या राजस्थान पासींगच्या कारमधून तब्बल ३५ लाख ७० हजार ७२० रुपयांचा अफूच्या सुकलेल्या बोंडांचा साठा जप्त केला आहे.
या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालकाला अटक करण्यात आली आहे, तर त्याचा साथीदार मात्र पसार झाला आहे. अशी माहिती कापूरबावडी वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांनी दिली.
कापूरबावडी जंक्शन, गोल्डन डाईज नाका येथे २२ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार हे वाहतूक नियमन करत होते.
त्यावेळी नाशिक-मुंबई मार्गावरून जाणाऱ्या राजस्थान पासिंग कारमध्ये संशयास्पद गोण्या वाहून नेल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कार थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला.
सतर्क झालेल्या खराडे आणि पवार यांनी पाठलाग करून कार अडवली. कारमध्ये दोन जण होते. त्यापैकी चालकाच्या शेजारी बसलेला इसम संधी साधून पसार झाला, तर चालकही पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
मात्र, दोन्ही वाहतूक पोलिसांनी त्याला पकडून कापूरबावडी वाहतूक उपविभाग कार्यालयात आणले. कारची तपासणी करताना सीटवर तसेच डिकीत ठेवलेल्या गोण्यांमध्ये अफूच्या सुकलेल्या बोंडांचा संशयित साठा आढळून आला.
याबाबत वरिष्ठांना कळवून त्यानंतर तत्काळ अमली पदार्थविरोधी पथकाला माहिती दिली. त्यानुसार, अमली पदार्थविरोधी पथकाने घटनास्थळी पंचांसमक्ष कारची तपासणी केली. पकडलेल्या चालकाने आपले नाव सिताराम प्रजापती असे सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
फरार आरोपीचा शोध सुरू...
पंचनाम्यानंतर कारसह सुमारे १५० किलो वजनाचा आणि अंदाजे ३५ लाख ७० हजार ७२० रुपये किमतीचा संशयित अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी पोलीस हवालदार सचिन खराडे आणि महिला पोलीस कर्मचारी मयुरी पवार यांच्या धाडसी व सतर्क कामगिरीचे कौतुक केले.