ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या पहिल्या तीन लाटांमध्ये ठाणेकरांचे लसीकरण करण्यात ठाणे जिल्हा सामान्य रूग्णालयाने मोलाचे योगदान बजावले आहे. १६ जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२३ दरम्यान या रूग्णालयात सुमारे १ लाख ३ हजार ३८१ ठाणेकरांचे लसीकरण करण्यात आले आहे. नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक ही लसही
या रूग्णालयात उपलब्ध आहे.
जानेवारी २०२० मध्ये पाऊल ठेवलेल्या कोरोनाने सगळ्यानांच पळता भुई थोडी केली होती. मात्र कोरोना सुरू झाल्यावर वर्षभराने आलेल्या लसीमुळे सर्वानांच दिलासा मिळाला होता. शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालये आणि जिल्हा सामान्य रूग्णालयात लस घेण्यासाठी झुंबड उडाली होती. रूग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचार्यांनी जीव धोक्यात घालून लसीकरणात मोलाची भूमिका बजावली. १६ जानेवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरणाचा लाभ सुमारे १ लाख ३ हजार ३८१ जणांनी घेतल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास साळवे यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना दिली.
जिल्हा सामान्य रूग्णालयात कोव्हिशिल्डच्या पहिला डोस सुमारे ३१ हजार ९४२ जणांनी दुसरा – सुमारे २७ हजार १९१ तर तिसरा डोस केवळ ६ हजार ६१२ जणांनी घेतला आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस सुमारे १५ हजार ८९४, दुसरा १८ हजार ११७ तर तिसरा डोस १ हजार ७२६ जणांनीच घेतला असल्याचे आकडेवारी सांगते आहे. कोर्बोव्हॅक्स लस कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. कोर्बोव्हॅक्स लसची पहिला ७७४, दुसरा १०८८ तर तिसरा डोस केवळ ३९ जणांनी घेतला आहे. नाकावाटे देण्यात येणारी इन्कोव्हॅक ही लसीचा बुस्टर डोस या रूग्णालयात देण्यात येणार आहे.
गेल्या सव्वा दोन वर्षात कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कार्बोव्हॅक्स या तीन प्रकारच्या कोरोना प्रतिबंधक लस जिल्हा सामान्य रूग्णालयात उपलब्ध होत्या. त्यात कोरोनाच्या लसीचे पहिले दोन डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, तिम्रया डोसकडे मात्र ठाणेकरांची संख्या तुलनेत खूपच कमी असल्याचे डॉ. पवार आणि साळवे यांनी सांगितले.