Thane Corona News | मुंबईनंतर ठाण्यातही कोरोना रुग्ण; घरीच उपचार सुरू
Thane COVID-19 Cases
ठाणे : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.
मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे १० रुग्ण आढळले असून त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. मात्र, संभाव्य वाढीचा अंदाज घेता जिल्हा आरोग्य प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.
ठाणे सिव्हिल रुग्णालयात ४० खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला आहे. हा कक्ष पूर्णपणे वातानुकूलित असून त्यामध्ये आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. डॉक्टर, नर्सेस आणि सहाय्यक कर्मचारी यांची स्वतंत्र नियुक्तीही करण्यात आली आहे. याशिवाय, रुग्णांच्या चाचण्या, विलगीकरण आणि औषधोपचारासाठी स्वतंत्र सुविधा विकसित करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
कळवा रुग्णालयात विशेष कक्ष
कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली असून त्या सर्व रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी चेतना नितील यांनी या बैठकीत दिली. त्याचबरोबर, सर्व आरोग्य केंद्रात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून तेथे टेस्टिंग कीटही आहेत, असेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे कोरोनाच्या रुग्णांसाठी १९ खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. आरटीपीसीआरची सुविधाही कळवा येथे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
