

Thane Water Crisis
ठाणे : ठाणे जिह्यातील ठाणे शहरासह जिल्ह्यातील काही शहरांचा,तसेच औद्योगिक क्षेत्र आणि वसाहतींचा पाणी पुरवठा 24 तास बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने बुधवार आणि गुरुवार असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने रहिवाशी भागाबरोबरच औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे रहिवाशी भागात पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात काही महत्वाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून ते शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत असा 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना तसेच औद्योगिक क्षेत्र, नगरपालिका आणि अनेक रहिवाशांना भागांना बारावी धरणातून पाणी पुरवठा होत असतो. बारवी धरणाचे पाणी आधी उल्हास नदी आणि त्यानंतर जांभुळपाडा जलशुद्धीकरण केंद्रात हे पाणी आणून त्यावर प्रक्रिया केली जाते. याच जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने या जलशुद्धीकरण केंद्रातून जिल्ह्यातील ज्या शहरांना आणि औद्योगिक क्षेत्रांना पाणीपुरवठा केला जातो त्या सर्व शहरांचा पाणीपुरवठा गुरुवार आणि शुक्रवार असा 24 तास बंद राहणार आहे.
यापूर्वी 16 मे रोजी हे दुरुस्तीचे काम करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र 16 मे रोजी हे काम न करता आता 23 मे म्हणजे गुरुवारी 12 पासून ते शुक्रवारी 12 पर्यंत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे दोन दिवस 24 तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडणार आहे. त्यानंतरही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे.
या दुरुस्तीच्या कामामुळे खाडीच्या पलिकडे असलेल्या मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग, तसेच, शहरातील वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं 2, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.