

डोंबिवली : कधी हिरवा पाऊस, कधी गुलाबी रस्ते, तर कधी हिरवा-निळा-लाल रंगाचा नाला, या सारख्या प्रदूषणाच्या समस्येसाठी डोंबिवली नेहमीच चर्चेत असते. एमआयडीसीमध्ये सद्या कार्यरत असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे या परिसरातील रहिवासी हैराण झालेले असतानाच आतातर वातावरणातून पसरणाऱ्या केमिलच्या प्रादुर्भावामुळे डोंबिवलीत निळ्या रंगाचा पाऊस पडल्याची चर्चा सुरू झाली असून निळ्या रंगाच्या पाण्याची छायाचित्रे समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहेत.
इतरत्र पडला तसा डोंबिवलीतही पाऊस पडला आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील रस्ते निळ्या रंगाचे झाले. एमआयडीसी परिसरात डाय बनवणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. त्यामधून बाहेर पडलेला फ्लोरोसीनचा हवेतील पाण्याशी संपर्क झाल्यामुळे जमिनीवरील पाणी हिरव्या रंगाचे झाल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यापूर्वी देखिल डोंबिवलीत हिरवा पाऊस पडल्याच्या वावड्या उठल्या होत्या. एरव्ही डोंबिवलीतील प्रदूषणाबाबत डोळ्यावर कातडे ओढलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या परिसरातील झाडांची पाने, माती यांचे नमुने गोळा करून घेऊन जातात. पण अहवालात स्पष्ट काही होत नसल्याने निवासी विभागातील रहिवासी चिंताक्रांत होतात
देशातील प्रदूषणकारी शहरांमध्ये डोंबिवलीचा १४ वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांत चंद्रपूरनंतर डोंबिवलीचा नंबर लागतो. या पार्श्वभूमीवर बोलताना मनसेचे नेते तथा स्थानिक माजी आमदार राजू पाटील म्हणाले, रासायनिक सांडपाण्याच्या वारंवार होणाऱ्या विसर्गासह विषारी गॅसच्या प्रादुर्भावामुळे वायू प्रदूषण निर्माण होत आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत. आश्वासन देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोंबिवली कार्यालयात बसत नाहीत. एमआयडीसीच्या निवासी विभागातील रहिवासी प्रदूषणामुळे अस्वस्थ झाले आहेत. रसायनयुक्त पाण्याशी संपर्क आल्यास त्वचाविकार, तर विषारी गॅसच्या प्रादुर्भावामुळे श्वसनाचे आजार जडण्याची भीती रहिवाश्यांमध्ये निर्माण झाली आहे. प्रशासनाचे अधिकारी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार माजी आमदार राजू पाटील यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिली.
डोंबिवलीतील रासायनिक कारखाने रात्रीच्या वेळी हवेत विविध घातक वायू आणि नाल्यांसह अगदी गटारांत लाल-हिरव्या रंगाचे पाणी सोडून देतात. प्रदूषण टाळण्याकरिता प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये त्यांनी हे पाणी सोडले तर अशा कारखान्यांच्या खऱ्या पाणी वापराचा भांडाफोड होईल. कंपन्यांमधील बॉयलर चालवण्याकरिता लागणारा कोळसा रस्त्यांवर टाकला जातो. त्याचा चुरा करून उघड्यावर ठेवला जातो. यामुळे एमआयडीसीलगतच्या निवासी वसाहतींमध्ये राहणाऱ्यांच्या घरी कोळशाच्या काळ्या भुकटीचे थर फर्निचरवर दिसतात. या परिसरात उभ्या केल्या जाणाऱ्या मोटारींवर, तेथील झाडा-पानांवर वेगवेगळ्या रंगाचे थर पसरलेले असतात. रहिवाशांना खोकला, डोळे चुरचुरणे, दमा असे अनेक विकार जडलेले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवलीमधील उच्चभ्रू, प्रतिष्ठित मंडळींचे बंगले व निवासस्थाने याच प्रदूषित पट्ट्यात आहेत. त्यामुळेच शनिवारी सायंकाळनंतर निळ्या पावसाची चर्चा सुरू झाली आहे.