

डोंबिवली : कधी हिरवा पाऊस, कधी गुलाबी रस्ते, तर कधी हिरवा-निळा-लाल रंगाचा फेसाळ नाला, या सारख्या प्रदूषणाच्या समस्येसाठी डोंबिवली नेहमीच चर्चेत असते. एमआयडीसीमध्ये सद्या कार्यरत असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे या परिसरातील रहिवासी हैराण झालेले असतानाच आता तर वातावरणातून पसरणाऱ्या केमिकलच्या प्रादुर्भावामुळे कपड्यांसह वाहनांवर पडलेले काळे डाग काही केल्या निघेनासे झाल्याने निवासी विभागातील रहिवासी चिंताक्रांत झाले आहेत.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागात राहणाऱ्या रहिवाशांना प्रदूषणाचा विचित्र प्रकार अनुभवायला मिळाला. पांढऱ्या वाहनांसह पत्र्याचे शेडस् आणि कपड्यांवर काळसर ठिपक्यांचे डाग उमटलेले आढळून आले. एम्स हॉस्पिटल आणि मिलापनगर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास आकाशातून पडलेल्या काही विशिष्ट पदार्थाच्या प्रादुर्भावामुळे खास करुन वाहनांवर काळसर ठिपके असलेले डाग पडले. हे डाग पाण्याने धुतले तरी जात नव्हते. विशेष म्हणजे हे डाग वाहनांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेऊन डिझेल वॉश केले तरी जात नव्हते. काळसर डागाचे ठिपके पादचाऱ्यांच्या शर्टावर पडल्याचे देखिल आढळून आले. हा प्रकार चिंताजनक असून हे कशामुळे झाले असावे याची सद्या तरी माहिती नसली तरी हा प्रदूषणाचा गंभीर प्रकार असल्याचे प्राथमिक दिसत आहे. निवासी भागातील शेकडो वाहने काळ्या डागांनी खराब झाली आहेत. शिवाय आकाशातून जमिनीवर पडलेले प्रदूषणकारी केमिकल पादचाऱ्यांसह रहिवाशांच्या नाका-तोंडात देखिल गेले असावे, असा कयास बांधला जात आहे. या गंभीर समस्येबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना कळवल्या त्यांच्याकडून हा कसला प्रकार आहे हे तपासाअंती समजू शकेल, असे डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.
एमआयडीसीमध्ये सद्या कार्यरत असलेल्या रासायनिक कारखान्यांमुळे या परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रारी केल्यास बघतो...करतो...अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रत्यक्ष मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. गेल्या 30 वर्षांपासून अधिक काळ डोंबिवलीकरांना प्रदूषणाचा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी येथील जनतेने अनेक प्रकारची आंदोलने केली. तेव्हा तात्पुरते प्रदूषण कमी व्हायचे. मात्र जनतेचा आवाज बसला की प्रदूषणाची पुनरावृत्ती होण्याला काळ आणि वेळ लागत नसल्याची तक्रार या भागातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी उज्वला गाडेकर, कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात कामा संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष देवेन सोनी, डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ताफ्याने एमआयडीसीच्या फेज एक आणि दोन भागात फिरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापी दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत केमिकल लोच्याचा कोणताही धागा-दोरा हाती लागला नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे ची कबुली देत मंगळवारी सकाळपासून पुन्हा शोध काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी उज्वला गाडेकर यांनी सांगितले.